Tamil Nadu School: तामिळनाडूत शाळकरी मुलांच्या सांबरमध्ये मिसळली शेणाची पूड, पतीचे संतापजनक कृत्य

माजी स्वयंपाकीच्या पतीने आठवीतील विद्यार्थिनीला सांबर दूषित करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप; शिक्षकांच्या सतर्कतेमुळे विद्यार्थ्यांना अन्न वाढण्यापूर्वीच प्रकार उघडकीस

Tamil Nadu School (इरोड): तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील सत्यमंगलम जवळील एका शासकीय माध्यमिक शाळेत पेरुंथलावर कामराजार मोफत नाश्ता योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी सांबर तयार करण्यात आले होते. या शाळेत पूर्वी आरुमुगम नावाच्या ४८ वर्षीय व्यक्तीची पत्नी आचारी (स्वयंपाकी) म्हणून काम करत होती. मात्र, तिच्या जेवणाच्या निकृष्ट दर्जाबाबत तक्रारी आल्यानंतर शाळेने दीड महिन्यापूर्वी तिला कामावरून काढून टाकले होते. याच गोष्टीचा सूड उगवण्यासाठी आरुमुगमने त्याच शाळेत शिकणाऱ्या ८ वीमधील एका विद्यार्थिनीला १० रुपये दिले. त्यातील ५ रुपयांचा खाऊ तिला घ्यायला सांगून उरलेल्या ५ रुपयांतून जवळच्या दुकानातून शेणाची पूड विकत घेण्यास सांगितले. त्यानंतर त्याने त्या मुलीला ही पूड सांबरमध्ये मिसळण्यास प्रवृत्त केले.

प्रकार उघडकीस कसा आला?
३१ ऑगस्ट रोजी सकाळी जेव्हा शिक्षकांनी रोजच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी बाजूला ठेवलेले सांबरचे सॅम्पल चाखून पाहिले, तेव्हा त्यांना ते नेहमीपेक्षा जास्त पिवळे आणि चवीला अत्यंत कडू लागले. शिक्षकांनी तातडीने मुख्याध्यापकांना याची माहिती दिली. त्यानंतर चौकशी दरम्यान संबधित विद्यार्थिनीने आरुमुगमच्या सांगण्यावरून सांबरमध्ये शेणाची पूड मिसळल्याची कबुली दिली.

या घटनेतील सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, त्या विद्यार्थिनीने शेणाची पूड फक्त शिक्षकांना चाखण्यासाठी वेगळ्या काढलेल्या छोट्या भांड्यातील सांबरमध्येच मिसळली होती. मुख्य मोठ्या भांड्यातील सांबर सुरक्षित होते, जे विद्यार्थ्यांना वाढले जाणार होते. शिक्षकांच्या सतर्कतेमुळे वेळीच हा प्रकार उघडकीस आला आणि विद्यार्थ्यांचे अन्न दूषित होण्यापासून वाचले.