Ad Advertisement Ad Advertisement

Plastic Waste to Protein Biscuits – प्लॅस्टिक आणि शेतीच्या कचऱ्यापासून बनणार प्रोटीन बिस्किट्स; सूक्ष्मजीवांच्या मदतीने शास्त्रज्ञांचा अनोखा प्रयोग

प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि शेतीतील कचऱ्याचे सूक्ष्मजीवांच्या मदतीने प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि पौष्टिक घटकांमध्ये रूपांतर

वॉशिंग्टन : Plastic Waste to Protein Biscuits आता प्लॅस्टिकच्या पाण्याच्या किंवा सोड्याच्या बाटल्या आणि शेतातील कचऱ्याचा (उदा. मक्याची सुकलेली ताटे आणि पाने) वापर चक्क खाण्यायोग्य बिस्किट्स बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. अमेरिकेतील सॉदर्न इलिनॉय युनिव्हर्सिटी कार्बोंडेल च्या संशोधकांनी अशा काही विशेष सूक्ष्मजीवांना (प्रोग्राम केलेल्या यीस्ट) विकसित केले आहे, जे प्लॅस्टिक आणि जैविक कचऱ्याचे रूपांतर प्रोटीन-युक्त बिस्किट्समध्ये करू शकतात. नासाच्या डीप स्पेस फूड चॅलेंज चा भाग म्हणून या प्रकल्पाला निधी मिळाला असून, अंतराळवीरांना अन्न पुरवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

ही प्रक्रिया कशी काम करते?

प्लॅस्टिक आणि अन्न या दोन्हीमध्ये प्रामुख्याने कार्बन हा मुख्य घटक असतो. शास्त्रज्ञांनी रासायनिक सोल्व्हेंट्स वापरण्याऐवजी निसर्गातील सूक्ष्मजीवांचा वापर करून एक पर्यावरणपूरक पद्धत शोधली आहे. प्रथम युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक केन अँडरसन यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाद्वारे पाणी, ऑक्सिजन, उच्च तापमान आणि दाबाचा वापर करून प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि शेतीचा कचरा कोणत्याही घातक रसायनांशिवाय लहान तुकड्यांमध्ये किंवा रेणूंमध्ये विभागला जातो. या विरघळलेल्या लहान कणांना प्रयोगशाळेत जनुकीय बदल केलेल्या वेगवेगळ्या यीस्ट (ज्यात बेकर्स यीस्टचाही समावेश आहे) समोर ठेवले जाते. हे सूक्ष्मजीव या कणांचे सेवन करून त्यांचे रूपांतर प्रोटीन, फॅट्स, जीवनसत्त्वे आणि फ्लेवरिंग कंपाउंड्समध्ये करतात. या तयार झालेल्या प्रोटीनयुक्त मिश्रणात फायबर, स्टार्च आणि गोडवा मिसळून ते एका थ्री डी फूड प्रिंटरमध्ये टाकले जाते. त्यातून तयार होणाऱ्या लहान आणि पौष्टिक बिस्किट्सना संशोधकांनी मायक्रोबाईट्स असे नाव दिले आहे.

चव आणि जीवनसत्त्वांची जोड

बिस्किट्सची चव आणि वास सुधारण्यासाठी शास्त्रज्ञ सॅकरोमायसेस सेरेव्हिसी नावाच्या यीस्टचा वापर करतात, जे वनस्पतींच्या कचऱ्यापासून व्हॅनिला फ्लेवर तयार करते. तसेच, आणखी एक विशिष्ट यीस्ट प्लॅस्टिकमधील घटकांपासून बीटा-कॅरोटीन तयार करते, ज्याचे मानवी शरीरात गेल्यानंतर व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर होते.

सुरक्षितता आणि भविष्यातील वापर

सध्याच्या प्राथमिक चाचण्यांनुसार हे मायक्रोबाईट्स बिस्किट्स खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. अधिकृत चव चाचणीसाठी अद्याप संस्थात्मक मंजुरी मिळणे बाकी आहे. शास्त्रज्ञांच्या मते, भविष्यात चंद्रावर किंवा मंगळावर जाणाऱ्या अंतराळवीरांना अन्न पुरवण्यासोबतच पृथ्वीवरील पूर-दुष्काळग्रस्त भाग, पाणबुड्या आणि जगातील वाढती अन्न टंचाई सोडवण्यासाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकते.

Read About : Ancient Ice in Tibet – तिबेटमध्ये हिमयुगातील बर्फ अजूनही शाबूत!

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.