कांगोच्या जंगलात १० वर्षे केलेल्या संशोधनातून खुलासा
ब्राझाव्हिल : Female Bonobos Hunting प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी वानर जगताविषयी महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. चिंपांझीसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या बोनोबो या वानरांच्या प्रजातीमध्ये नरांपेक्षा मादी बोनोबो अधिक प्रमाणात आणि आक्रमकतेने शिकार करत असल्याचे एका दशकभराच्या सखोल अभ्यासातून समोर आले आहे. निसर्गात सामान्यत: नर प्राणी शिकारीची मुख्य भूमिका बजावतात, हा जुना समज या शोधामुळे मोडीत निघाला आहे.
दशकभराच्या अभ्यासातून ही माहिती आली समोर
कांगोच्या घनदाट जंगलात बोनोबो वानरांच्या विविध गटांवर तब्बल १० वर्षे पाळत ठेवून हा अभ्यास करण्यात आला. यात संशोधकांना आढळले की, जेव्हा लहान हरणे किंवा इतर लहान प्राण्यांची शिकार करण्याची वेळ येते, तेव्हा मादी बोनोबो केवळ पुढाकारच घेत नाहीत, तर शिकार करण्यात नरांपेक्षा अधिक यशस्वी होतात.
मादी बोनोबोचे वर्चस्व
बोनोबो वानरांचे समाजकारण हे इतर वानरांच्या तुलनेत वेगळे असते. त्यांच्या समूहाचे नेतृत्व मादी बोनोबो करतात. शिकार केल्यानंतर त्या मांसावर पहिला हक्क मादीचा असतो. ती स्वत: पोटभर खाल्यानंतरच समूहातील इतर नरांना किंवा पिल्लांना मांसाचा वाटा देते. गर्भधारणा, पिल्लांचे संगोपन आणि स्तनपान या काळात मादी बोनोबोंना जास्त प्रथिनांची गरज असते, ज्यामुळे त्यांच्यात शिकारीची प्रवृत्ती अधिक विकसित झाली असावी, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.
चिंपांझीपेक्षा पूर्णपणे वेगळे वर्तन
बोनोबो हे दिसायला चिंपांझीसारखेच असले तरी त्यांच्या वागण्यात खूप जास्त फरक आहे. चिंपांझींच्या समूहात नर अत्यंत हिंस्र असतात आणि तेच प्रामुख्याने शिकार करतात. याउलट, बोनोबो समूहात शांतताप्रिय वातावरण असते आणि तिथे मादींचे वर्चस्व चालते. प्राण्यांच्या उत्क्रांतीचा आणि त्यांच्यातील सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यासाठी हा शोध अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
Read About : Wildlife Water Scarcity in Marathwada – जंगलातील पाणवठे आटण्याच्या मार्गावर, मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होणार ?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.