Moon Nuclear Reactor : चंद्रावर ऊर्जा निर्मिती करणारी अणुभट्टी उभारण्यासाठी सध्या अमेरिका आणि रशिया-चीन यांच्यात स्पर्धा लागलीय. २०३६ साल तिघांच्या डोक्यात आहे. रशिया आणि चीन यांच्यात सहकार्य आहे. चंद्रावर काय काय आहे याचा शोध अजून पूर्ण झालेला नसतानाही अणुभट्टीची खटपट का चाललीय?
सध्या अवकाशयानं चंद्रावर जातात, अवकाशवीर चंद्रावर फेरफटका मारून माती, हवा इत्यादींचे नमुने गोळा करून, फोटो काढून परततात. लोकांना आशा वाटतेय की चंद्रावर पाणी सापडेल. ते सापडलं की चंद्रावर वस्ती उभारायचे प्लॅन आहेत. कारखाने काढणार, नाना प्रक्रिया करणाऱ्या प्रयोगशाळा काढणार, माणसं वसती करणार. या लोकाना चंद्र हे जंक्शन करायचंय. तिथून यानं मंगळावर पाठवायचीत.
जंक्शन करायचं म्हणजे तिथं पृथ्वीवरून जाणारी यानं उतरण्याची व्यवस्था हवी. नंतर चंद्र ते मंगळ अशी यानं उडवण्याची व्यवस्था हवी. चंद्रावर वस्ती केल्याशिवाय ते कसं जमणार?
सगळ्या कामाची सुरुवात करण्यासाठी आधी वस्ती तर करायला हवी, या वस्तीतले लोक नंतर चंद्रावर इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार.
दोन गोष्टी लागणार. प्राणवायू आणि इंधन.
चंद्रावर बर्फ आहे. चंद्रावर अनेक धातूंची प्राणावायूसह झालेली संयुगं आहेत. दोन्हीपासून प्राणवायू वेगळा करणं शक्य आहे. ते साधण्यासाठी यंत्रं चालवावी लागणार, त्यांना इंधन लागणार. साऱ्या उभारणीसाठी जाणाऱ्या लोकांना राहण्यासाठी इंधन लागणार. चंद्रावर +१३० ते -१३० अशी टोकाची तापमानं असतात. घरं थंड ठेवावी लागतील, घरं उबदारही ठेवावी लागतील. त्यासाठी इंधन लागेल.
चंद्रावर नद्या नाहीत, धरणं बांधून वीज तयार करता येत नाही. वारा नाही, पवन उर्जा शक्य नाही. चंद्रावर लागोपाठ १४ दिवसांची रात्र असते. सौर उर्जा कशी तयार होणार? सतत १४ रात्री सौर उर्जा होणार नाही. समजा तयार झाली तरी ती बॅटरीत साठवून ठेवावी लागणार, म्हणजे आणखी एक भानगड.
अणुऊर्जा हा मार्ग दिसतोय. अणुभट्टीत ऊष्णता निर्माण करायची आणि त्या उष्णतेवर जनित्रं चालवून वीज तयार करायची.
मोठ्या अणुभट्ट्यांचा विचार अमेरिकेनं केव्हाच सोडला, तशी उभारणी अशक्य आहे असं अमेरिकेच्या लक्षात आलं. १९६० साली अमेरिकेनं छोट्या अणुभट्टीची कल्पना केली. अणुभट्टीचे भाग चंद्रावर नेऊन जोडणी करण्याचा विचार झाला. अनेक अडचणी. पृथ्वीवर भट्टीवर एक संरक्षक कवच असतं. कवच किरणोत्सार थोपवतं. त्या कवचाचं डिझाईन अजून तयार झालेलं नाही. अणुभट्टीत तयार होणारी काही ऊष्णता वीज निर्मितीसाठी वापरली जाते, काही उरते, तिचं काय करायचं याचं उत्तर अजून सापडलेलं नाही.
चंद्रावर पृथ्वीच्या एक तृतीयांश गुरुत्वाकर्षण आहे. माणसांना चालावं, काम करावं लागणार. बुलडोझर चालवावा लागणार, जमीन खणण्यासाठी पहारी-हातोडे (यांत्रिक) वापरावे लागणार. कमी गुरुत्वाकर्षणात वरील गोष्टी कशा घडणार? अजून या प्रश्नाला समाधानकारक उत्तर सापडलेलं नाही. अमेरिका, रशिया, चीन इत्यादी लोक चंद्रावर आपापले तळ उभारणार. ही सगळी तगडी मंडळी, त्यांच्याकडं त्यासाठी पैसा आहे. भारत, श्रीलंका, बांगलादेश इत्यादी देश काय करतील? कदाचित मोठा तळ जमला नाही तरी तंबू तरी उभारतील. या खटाटोपात चंद्राची मालकी कोणाकडं असेल?
चंद्राच्या जमिनीचा वापर कोणी कसा करायचा याचाही विचार सुरू आहे. १९६७ साली एक आंतरराष्ट्रीय करार झाला. जशी समुद्रावर कोणाची मालकी नसते तशी चंद्रावर कोणा एकाची मालकी नसेल असं या करारात ठरलं. १०० देशांनी या करारावर सह्या केल्या. ही ६० वर्षांपूर्वीची गोष्ट झाली. आता जग बदललंय. चंद्राचा उपयोग समाईक रीतीनं, समजुतीनं करायचा जरी ठरलं तरी त्या कराराची अंमलबजावणी कोण करणार? होर्मुझ खाडीचं प्रकरण ताजं आहे. या खाडीची मालकी कोणाची यावरून युद्ध चाललंय. कोणाच्याही मालकीच्या नसलेल्या महासागरात जहाजांवर सर्रास हल्ले होत आहेत. चंद्रावर काही वेगळं घडेल अशी शक्यता दिसत नाही.
चंद्र, चंद्रावरची वस्ती, अणुभट्ट्या इत्यादी गोष्टी अजून टाईमपासच आहेत, तरीही त्यावर खर्च होतोय. अमेरिकेनं अब्जावधी डॉलर खर्च केलेत. रशियाकडं तितके पैसे नाहीत, रशियानं चीनबरोबर टोळी केलीय. सर्वांना २०३६ पर्यंत अणुभट्टी बसवायचीय.
इतकी घाई का?
तिन्ही देशातल्या धनिकांना घाई सुटलीय. धनिकांनी चंद्र हा एक धंद्याचा प्रदेश करून टाकलाय. चंद्रावरच्या घरांची कल्पनाचित्रं आर्किटेक्ट लोकांनी तयार केलीत. चंद्रावरच्या कार कशा असतील आणि स्थानिक वाहतुकीची विमानं कशी असतील याची मॉडेल तयार झालीत. युरोपीय लोकांनी फकाट अमेरिकेचाताबा घेऊन आजची अमेरिका वसवली, याचीच आवृत्ती अमेरिकन उद्योगपतींना चंद्रावर काढायचीय; त्यांना चंद्र ही वसाहत करायचीय.
चंद्र हे पर्यटन क्षेत्रं व्हायचंय. या पर्यटनाचा पाया घातला गेलाय. काही दिवसांपूर्वी एक यान प्रवाशांना अवकाशात घेऊन गेलं, प्रवाशांना गुरुत्वाकर्षण विरहीत वातावरणाचा अनुभव काही मिनिटांसाठी या यानात दिला गेला. या यानाच्या लक्षावधी डॉलरच्या तिकिटाची बोली लावली गेली, ज्यांना तिकीट मिळालं नाही ते धनिक दु:खी झाले होते.
अनेक धनिक पृथ्वीवर सुखी नाहीत. पृथ्वीवरचं पर्यावरण प्रदूषित झालंय, जगणं कठीण झालंय याची खंत धनिकांना आहे, म्हणून त्यांना आता शुद्ध हवेचा चंद्र हवाय. पृथ्वी रोगराई आणि उपासमारीसाठी सोडून देऊन मंडळी चंद्रावर स्थायिक होण्याची स्वप्न पहात आहेत.
त्यासाठी चंद्रावर वस्तीची सोय हवी. त्यासाठी चंद्रावर वीज निर्मिती करायला हवी. त्यासाठी चंद्रावर अणुभट्टी उभारायला हवी. ही गरज पृथ्वीवरच्या काही धनिकांची आहे. सरकार धनिकांच्या मर्जीवरच चालत असल्यानं सरकारंही चंद्रावर जाण्याच्या शर्यतीत, चंद्रावर अणुभट्टी उभारण्याच्या खटपटीत आहेत.
तर असं आहे.
पृथ्वीची वाट लावून झाली आहे.
चला. आता चंद्राची वाट लावूया.
निळू दामले
damlenilkanth@gmail.com
Read About: Japan MMX Mission : मंगळाच्या चंद्रावरून माती आणणार जपान; 2031 मध्ये नमुने पृथ्वीवर
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.