कल्याण आमणे टोल प्लाझाजवळील घटना : छत्रपती संभाजीनगरातून एका आरोपीला बेड्या
Samruddhi Expressway robbery छत्रपती संभाजीनगर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी पुन्हा डोके वर काढले आहे. कल्याण (जि. ठाणे) येथील आमणे टोल प्लाझाजवळ भरदिवसा एका शासकीय अभियंत्याला बंदुकीचा आणि चाकूचा धाक दाखवून लुटले. इनोव्हा कारसह ३० हजार रुपये रोकड लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला होता. ही घटना २ नोव्हेंबरला सकाळी १०.४५ वाजता घडली. या प्रकरणी टिटवाळा (ता. कल्याण, जि. ठाणे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने टीव्ही सेंटर भागातून एका आणि करमाड व बदनापूर भागातून दोघांना ताब्यात घेतले.
गोपाळ शामलाल बमनावत (२४, रा. रामवाडी, ता. छत्रपती संभाजीनगर) आणि लहू जयसिंह बारवाल (१८, रा. सिरसगाव, ता. बदनापूर, जि. जालना) अशी संशयितांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृद व जलसंधारण विभाग, मुंबई येथील कार्यकारी अभियंता फरीद खान हे आपल्या चालकासह इनोव्हा कारने (एमएच ०२, ईएच ५०१९) छत्रपती संभाजीनगरहून मुंबईकडे जात होते. २ नोव्हेंबरला सकाळी पावणेअकराच्या सुमारास समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक ६९१ जवळ पांढऱ्या रंगाच्या एर्टिगा कारमधून (एमएच २०, एचएन ६३७७) आलेल्या तोंडाला मास्क लावलेल्या ५ ते ६ दरोडेखोरांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी चालक कृष्णा बाविस्कर व अभियंत्याला पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून खाली उतरवले आणि ३० हजार रुपयांची रोकड, मोबाइल तसेच एटीएम कार्डसह इनोव्हा कार पळवून नेली.
जीपीएसमुळे गाडीचा लागला पत्ता
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पाठलाग सुरू केला. पीडितांनी जीपीएस प्रणालीद्वारे कार ट्रॅक केली असता, ती कार खुटघर टोलनाक्याजवळ (चॅनल क्र. ६७४.८) नागपूर वाहिनीवर मिळून आली. दरोडेखोर ती गाडी सोडून पसार झाले होते. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
संशयित आरोपी संभाजीनगरमधून जेरबंद
लुटलेली इनोव्हा कार संभाजीनगरची असल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना दिली. त्यांनी उपायुक्त रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांना तपासाचे आदेश दिले. त्यावरून सिडको ठाण्यातील उपनिरीक्षक सोपान नरळे यांच्यासह डीबी पथक आणि वाहतूक शाखेचे अंमलदार सोनवणे यांच्या मदतीने कल्याण पोलिसांनी टीव्ही सेंटर चौक परिसरात सापळा रचून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यावरून गोपाळ बमनावत आणि लहू बारवाल या दोघांना पकडले.
महत्त्वाचे मुद्दे
Read About: Shraddha Kapoor Eetha Trailer – ‘नाचता नाचता मरेन, पण इतिहास घडवून जाईन’
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.