Ad Advertisement Ad Advertisement

13 Lakh Cash Stolen in Sambhajinagar – देवळाईत अवघ्या ३ तासांत फोडले घर; १३ लाख रोकड लंपास!

कुटुंबीय हैदराबादला जाताच चोरटे घरात : चिकलठाणा पोलिसांची घटनास्थळी धाव

छत्रपती संभाजीनगर : 13 Lakh Cash Stolen in Sambhajinagar चोरांची दिवाळी सुरू झाली असून कुटुंबीय घराला कुलूप लावून हैदराबादला जाताच मागे अवघ्या तीन तासांत घर फोडण्यात आले. चोरांनी घरातून १३ लाख रोकड आणि सात ते आठ ग्रॅम सोने, सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर लंपास केल्याचा अंदाज आहे. दरम्यान, कुटुंबीय हैदराबादहून परतल्यावर या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल. तत्पूर्वी पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (दि. ३) घटनास्थळी धाव घेत पाहणी करून तपासाला सुरुवात केली आहे.

सिद्धोधन पाखरे (४१) हे कुटुंबीयांसह देवळाई परिसरातील साईनील सोसायटीत राहतात. पाखरे दाम्पत्य खासगी नोकरी करते. पाखरे यांची बहीण हैदराबाद येथे आहे. त्यांच्याकडे कौटुंबीक कार्यक्रम असल्याने सोमवारी रात्री ८ वाजता अख्खे कुटूंब हैदराबादला गेले.

जाताना त्यांनी घराला कुलूप लावले होते. ते गेल्यानंतर मध्यरात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास चोरांनी त्यांचे घर फोडले. घरात घुसलेल्या चोरांनी चावीने कपाट उघडून साहित्याची फेकाफेक करीत सुमारे १३ लाख रुपये रोकड, सात ते आठ ग्रॅमचे दागिने, सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर असा ऐवज लंपास केला. कुटुंबीय हैदराबादला गेल्यानंतर लगेचच चोरांनी डल्ला मारल्यामुळे पोलीस वेगळ्या अँगलनेही तपास करीत आहेत. एवढी मोठी रोकड घरात कशाची आणली होती?, एवढी मोठी रक्कम कपाटात असताना कपाटाची चावी तेथेच का ठेवली? याचाही पोलिसांना उलगडा झालेला नाही. कुटुंबीय परतल्यावर याबाबत चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

ठसे तज्ज्ञ, श्वान पथकाला पुरवा नाही

पाखरे यांच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी पाखरे यांना फोनद्वारे संपर्क साधल्यानंतर घरात जाऊन पाहणी केली. त्यावर हा प्रकार चिकलठाणा पोलिसांना कळविला. पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उत्तम नागरगोजे यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी केली. तसेच, ठसे तज्ज्ञ, श्वान पथकाला पाचारण केले. मात्र, या पथकांना घरात कुठलाही पुरावा मिळाला नाही. श्वान घटनास्थळीच घुटमळल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Read About : Husband Suicide After Wife Affair – पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची सासरवाडीतच आत्महत्या
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.