करमाड एमआयडीसीत चेंबरमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, दहा दिवसांपासून सुरू होता तपास
Karmad MIDC murder case करमाड : गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गोलटगाव येथील लेबर कंत्राटदाराचा निर्घृण खून करून मृतदेह चेंबरमध्ये टाकल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. ३) उघडकीस आला. इंद्रजीत खुळे (वय ५१, रा. गोलटगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) असे मृत कंत्राटदाराचे नाव आहे. करमाड एमआयडीसी परिसरातील नवीन बांधकाम सुरू असलेल्या कंपनीसमोरील रस्त्यालगत असलेल्या चेंबरमध्ये त्यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
प्राथमिक तपासात खुळे यांना आधी दगडाने ठेचून त्यानंतर जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, संशयितांच्या शोधासाठी करमाड पोलिसांचे एक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक अशी दोन पथके उत्तर प्रदेशातील कानपूर येथे रवाना झाली आहेत.
दहा दिवसांपासून नातेवाइकांची शोधाशोध
इंद्रजीत खुळे हे लेबर कंत्राटदार म्हणून काम करीत होते. २३ ऑक्टोबर रोजी ते अचानक बेपत्ता झाले. त्यानंतर त्यांचा मोबाईलही बंद येत असल्याने कुटुंबीय आणि नातेवाइकांची चिंता वाढली होती. सुरुवातीला नातेवाइकांनी मित्रमंडळी, कामगार तसेच परिचितांकडे चौकशी केली. विविध ठिकाणी शोध घेऊनही त्यांचा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर त्यांचे पुतणे विशाल भास्कर खुळे (रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी करमाड पोलिस ठाण्यात धाव घेऊन बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. मात्र, दहा दिवसांनंतर बेपत्ता कंत्राटदाराचा मृतदेहच आढळल्याने या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले.
दुर्गंधीमुळे उघडकीस आला खुनाचा प्रकार
मंगळवारी करमाड एमआयडीसी परिसरात जमीन संपादित झालेल्या एका शेतकऱ्याने आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेला असता, नवीन बांधकाम सुरू असलेल्या कंपनीसमोरील रस्त्यालगत असलेल्या चेंबरमधून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्याने चेंबरमध्ये डोकावून पाहिले असता कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. हा प्रकार पाहून तो भयभीत झाला. त्याने तातडीने करमाड पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची अवस्था गंभीर असल्याने फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला. तपासादरम्यान मृतदेहाची ओळख इंद्रजीत खुळे अशी पटली आणि दहा दिवसांपासून सुरू असलेल्या शोधमोहीमेचा शेवट अत्यंत दुर्दैवी ठरला.
दगडाने ठेचून जाळल्याचा संशय; खुनाचा गुन्हा दाखल
खुळे यांचा मृतदेह ज्या परिस्थितीत आढळून आला, त्यावरून त्यांचा घातपात झाल्याचा संशय बळावला आहे. त्यांना आधी दगडाने ठेचून त्यानंतर जाळण्यात आल्याची माहिती तपासातून समोर येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण आणि हत्येची पद्धत वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट होणार आहे. मृतदेह चेंबरमध्ये कोणी टाकला, हत्या नेमकी कुठे करण्यात आली आणि त्यामागे कोणता वाद अथवा आर्थिक कारण होते का, याचा पोलिस तपास करीत आहेत. अपहरणाच्या गुन्ह्याचे आता खुनाच्या गुन्ह्यात रूपांतर करण्यात आले आहे.
संशयित कामगाराच्या शोधासाठी दोन पथके कानपूरला
या हत्येमागे उत्तर प्रदेशातील एका कामगाराचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याअनुषंगाने करमाड पोलिस ठाण्याचे एक पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक अशी दोन पथके उत्तर प्रदेशातील कानपूर येथे रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, लवकरच खुनाचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी व्यक्त केला.
खुनामागील नेमके कारण काय?
दहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला कंत्राटदार, बंद मोबाईल, नातेवाइकांची धावपळ आणि अखेर एमआयडीसीतील चेंबरमध्ये सापडलेला मृतदेह… या घटनाक्रमामुळे खुनामागील नेमके कारण काय, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता उत्तर प्रदेशात रवाना झालेली पोलिस पथके कोणाला ताब्यात घेतात आणि या निर्घृण हत्येचा उलगडा कधी होतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Wildlife Water Scarcity in Marathwada – जंगलातील पाणवठे आटण्याच्या मार्गावर, मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होणार ?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.