Ad Advertisement Ad Advertisement

UN Action : बलोचिस्तानमधील कोठडीतील हत्येप्रकरणी पाकिस्तानवर संयुक्त राष्ट्रांचे ताशेरे

स्वतंत्र आणि निपक्षपाती चौकशी करण्याची जोरदार मागणी

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) : बलोचिस्तानमधील इम्रान अली या नागरिकाचे झालेले सक्तीचे अपहरण, छळ आणि त्यानंतर कोठडीत झालेली हत्या या प्रकरणावरून संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN Action) मानवाधिकार तज्ज्ञांनी पाकिस्तान सरकारवर तीव्र ताशेरे ओढले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने, स्वतंत्र आणि निपक्षपाती चौकशी करण्याची जोरदार मागणी युएनने पाकिस्तानकडे केली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या उच्चायुक्त मानवाधिकार कार्यालयाने (ओएचसीएचआर) जारी केलेल्या निवेदनानुसार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागाच्या सुमारे २० कर्मचाऱ्यांनी इम्रान अली याचे त्याच्या घरातून अपहरण करून एका अज्ञात स्थळी ठेवले होते. त्याच्या कुटुंबाला त्याच्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.
इम्रानसोबत अटकेत असलेल्या आणि नंतर सुटका झालेल्या इतर काही व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रानला अत्यंत अमानुषपणे छळण्यात आले होते.

चकमकीचे खोटे दावे आणि मृतदेहाची विल्हेवाट


६ ऑगस्ट २०२६ रोजी ‘पाकिस्तानच्या सक्तीच्या अपहरणांसंदर्भातील चौकशी आयोगा’समोर झालेल्या सुनावणीदरम्यान हे प्रकरण पुन्हा समोर आले. एका पोलिस अधिकाऱ्याने आयोगाला सांगितले की, मे २०२६ मध्ये झालेल्या एका तथाकथित चकमकीत इम्रान अली मारला गेला आहे.
अधिकाऱ्यांनी दावा केला की, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी सुमारे एक महिना लागला आणि मृतदेह जतन करणे शक्य नसल्याने जून महिन्यातच त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या माहितीनंतर इम्रानच्या कुटुंबीयांनी क्वेट्टा येथील नागरी रुग्णालयात जाऊन नोंदींमधील फोटोंवरून त्याची ओळख पटवली.

इतर ६ अनामिक मृतदेहांबाबतही शंका


यूएनच्या तज्ज्ञांनी इम्रान अलीच्या मृतदेहासोबत रुग्णालयात आणलेल्या इतर सहा मृतदेहांच्या हाताळणीवरही गंभीर चिंता व्यक्त केली आहे. रुग्णालय प्रशासन किंवा पोलिसांनी कोणत्याही मृतदेहाची योग्य दस्तऐवजीकरण न करता किंवा नातेवाईकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची विल्हेवाट लावली.

बलोचिस्तानमध्ये सातत्याने होणाऱ्या सक्तीच्या अपहरणांचे प्रमाण पाहता, हे इतर सहा मृतदेहदेखील अशाच प्रकारे गायब करण्यात आलेल्या नागरिकांचे असू शकतात, अशी भीती युएनच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने या प्रकरणाची स्वतंत्र फॉरेन्सिक तपासणी करून इम्रान अलीचे अवशेष सन्मानाने त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्याची आणि त्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.