दिवसाला पाच कपांपेक्षा अधिक कॉफी घेणाऱ्या ज्येष्ठ महिलांमध्ये हाडांची घनता कमी
ॲडलेड : Coffee Alert :सकाळचा पहिला कॉफीचा कप अनेकांसाठी ‘एनर्जी बूस्टर’ असतो. पण दिवस पुढे जाताना कपांची संख्या पाच-सहापर्यंत पोहोचत असेल, तर जरा सावध व्हा. नव्या अभ्यासानुसार, दिवसाला पाच कपांपेक्षा जास्त कॉफी पिणाऱ्या ज्येष्ठ महिलांच्या हाडांची घनता कमी असल्याचे आढळले आहे. याउलट, चहा पिणाऱ्या महिलांच्या हाडांची घनता किंचित जास्त असल्याचे दिसून आले.
फ्लिंडर्स विद्यापीठातील संशोधकांनी जवळपास १० हजार महिलांचा १० वर्षे अभ्यास केला. या सर्व महिला ६५ वर्षांवरील होत्या. त्यांच्या चहा-कॉफी पिण्याच्या सवयी आणि हिपसह महत्त्वाच्या हाडांची घनता यांचा वेळोवेळी अभ्यास करण्यात आला.
दोन-तीन कप कॉफी ठीक
अभ्यासानुसार, दिवसाला दोन ते तीन कप कॉफी पिणाऱ्या महिलांमध्ये हाडांच्या आरोग्यावर विशेष दुष्परिणाम दिसला नाही. मात्र, पाच कपांपेक्षा जास्त कॉफी घेणाऱ्या महिलांमध्ये हाडांची घनता कमी असल्याचे आढळले.
कॉफीमधील कॅफीन शरीरातील कॅल्शियमचे शोषण आणि हाडांच्या चयापचयावर काही प्रमाणात परिणाम करू शकते. जास्त कॉफीसोबत मद्यपानाची सवय असलेल्या महिलांमध्ये हा नकारात्मक संबंध अधिक दिसून आला.
चहाचा कप ठरू शकतो फायदेशीर?
चहामध्ये आढळणारे कॅटेचिन्स हे घटक हाडांची निर्मिती वाढवण्यास आणि हाडांची झीज कमी करण्यास मदत करू शकतात, असा संशोधकांचा अंदाज आहे. त्यामुळे मध्यम प्रमाणात चहा घेणे हाडांसाठी फायदेशीर ठरू शकते.
मात्र, संशोधकांनी या परिणामांना मर्यादित स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कॉफी पूर्णपणे सोडण्याची गरज नाही. हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम, जीवनसत्त्व ‘डी’, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांना आजही सर्वाधिक महत्त्व आहे.
घाबरू नका, सावध व्हा
कॉफी पिण्यापुर्वी आजच्या कपांची संख्या नक्की मोजा. मध्यम प्रमाणातील कॉफीचा आनंद घ्या, अतिरेक टाळा आणि अधूनमधून चहाचा कपही निवडा. कारण मजबूत हाडांसाठी तुमच्या कपात काय आहे, यापेक्षा तो किती वेळा भरला जातो, हेही महत्त्वाचे ठरू शकते.
