Brain Aging : आर्थिक ताणामुळे मेंदू वेगाने वृद्ध होतो? UCL संशोधनाचा मोठा खुलासा

२६ ते ५३ वयोगटातील दीर्घकालीन आर्थिक ताणाचा परिणाम पुढील आयुष्यात दिसण्याची शक्यता

Brain Aging : लंडन : तरुण वयात किंवा मध्यम वयातील सततची आर्थिक ओढताण आणि पैशांची चिंता भविष्यात मेंदूच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते. दीर्घकाळ राहिलेल्या आर्थिक अडचणींमुळे वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत विचार करण्याची क्षमता कमी होऊ शकते आणि उतारवयात मेंदू वेगाने आकुंचन पावण्याचा धोका वाढू शकतो, असे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (युसीएल) मधील संशोधकांनी केलेल्या एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे.

इनोव्हेशन इन एजिंग या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. संशोधकांनी १९४६ मध्ये ब्रिटनमध्ये जन्मलेल्या २,७५९ लोकांच्या जीवनाचा अनेक दशकांपर्यंत अभ्यास केला. त्यातून दीर्घकालीन ताणाचा काय परिणाम होतो याचे हे निष्कर्ष समोर आले. ज्या लोकांना तरुण वयात आणि मध्यम वयात (२६ ते ५३ वर्षे वयोगटात) सतत आर्थिक चणचण भासली किंवा उत्पन्नाची कमतरता जाणवली, त्यांची वयाच्या ५३ व्या वर्षी बौद्धिक आणि स्मरणशक्तीच्या चाचण्यांमधील कामगिरी निकृष्ट असल्याचे दिसून आले.

यातील ज्या लोकांचे मेंदूचे स्कॅनिंग करण्यात आले, त्यांच्यात वयाच्या ६९ ते ७१ दरम्यान मेंदूचे आरोग्य खालावल्याचे आणि मेंदू आकुंचन पावल्याचे आढळून आले. हा धोका महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक स्पष्टपणे दिसून आला. कुटुंबाची मुख्य जबाबदारी असणे आणि आर्थिक ताणामुळे व्यसनाधीनता किंवा चुकीच्या सवयींकडे वळणे ही यामागची मुख्य कारणे असू शकतात, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

आर्थिक ताण मेंदूला कसा प्रभावित करतो?

सततच्या आर्थिक चिंतेमुळे शरीरात दीर्घकाळ ताण राहतो, ज्यामुळे मेंदूच्या वेगाने म्हातारे होण्यास कारणीभूत ठरणारा दाह वाढू शकतो. बिलांची आणि पैशांची चिंता सतत डोक्यात राहिल्यामुळे मेंदूची इतर कामांमधील ऊर्जा आणि एकाग्रता कमी होते. दारिद्य्र व आर्थिक असुरक्षितता केवळ जीवनात भौतिक अडचणी निर्माण करत नाही, तर ती माणसाच्या मेंदूला आणि स्मरणशक्तीला आतून कमकुवत बनवते. त्यामुळे आर्थिक स्थैर्य आणि गरिबी निर्मूलन हे केवळ जीवनमान सुधारण्यासाठीच नव्हे, तर डिमेंशिया (स्मृतीभ्रंश) सारख्या आजारांना रोखण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचे आहे, असा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे.