रासुवामधून हेलिकॉप्टरने चिनी नागरिकाला काठमांडूला हलवले; बेट्रावती बाजारातून बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या चंद्रिका श्रेष्ठ यांचीही सुटका
काठमांडू : Nepal Rescue Operation: नेपाळमध्ये भीषण पुरानंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान शनिवारी रासुवा जिल्ह्यातून एका चिनी नागरिकाची आणि नुवाकोटमधून 64 वर्षीय चंद्रिका श्रेष्ठ यांची जिवंत सुटका करण्यात आली. नेपाळी लष्कर आणि पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली. रासुवा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातून नेपाळी लष्कराने चिनी नागरिकाची सुटका केली. त्यानंतर त्याला हेलिकॉप्टरच्या मदतीने काठमांडू येथे आणण्यात आले. बचावलेल्या चिनी नागरिकासह नुवाकोटमधील चंद्रिका श्रेष्ठ यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चंद्रिका श्रेष्ठ यांची बेशुद्ध अवस्थेत सुटका
नुवाकोटच्या रहिवासी असलेल्या चंद्रिका श्रेष्ठ यांची बेट्रावती बाजारातून सुटका करण्यात आली. नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र पोलीस दलाचे निरीक्षक सुमन बीके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही बचावमोहीम राबवली.
श्रेष्ठ या बचाव पथकाला बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. सुटकेनंतर त्यांना हेलिकॉप्टरने त्रिशुली येथील नेपाळी लष्कराच्या मैथिलक बॅरॅक्स येथे नेण्यात आले.
तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना काठमांडू येथे हलवण्यात येणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले.
त्रिशुली-3A प्रकल्पातूनही दोघांची सुटका
शनिवारी झालेल्या या दोन बचाव मोहिमांपूर्वी शुक्रवारी त्रिशुली-3A जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातून दोन व्यक्तींची जिवंत सुटका करण्यात आली होती.
काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे खासदार श्री राम नेउपाने यांच्या हवाल्याने या दोघांची ओळख संजय साह, मेकॅनिकल फोरमन आणि कबीर महर्जन, मेकॅनिकल सुपरवायझर अशी करण्यात आली आहे.
पुरामुळे 1,344 जणांचा मृत्यू
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे आतापर्यंत किमान 1,344 जणांचा मृत्यू झाल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. दुर्गम भागांमध्ये अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी नेपाळी लष्कर आणि आंतरराष्ट्रीय पथकांकडून मोठ्या प्रमाणावर Humanitarian Assistance and Disaster Relief (HADR) ऑपरेशन सुरू आहे. नुवाकोट जिल्ह्यात पूरामुळे फुगलेल्या ताडी नदीवर Rope Bridge उभारण्याचे काम लष्करी अभियांत्रिकी पथकांकडून सुरू आहे. राष्ट्रीय रस्ते नेटवर्कपासून तुटलेल्या भागांचा जमिनीमार्गे संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, नुवाकोट आणि रासुवा या सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांमध्ये शोध, बचाव आणि मदतकार्यासाठी नेपाळी लष्कराने सुमारे 20 हेलिकॉप्टर तैनात केली आहेत. प्रतिकूल हवामान, डोंगराळ भाग आणि पुरामुळे खराब झालेल्या हेलिपॅडची कमतरता असूनही हवाई बचावकार्य सुरू आहे.
भारताकडूनही नेपाळला मदत
नेपाळमधील HADR Operations मध्ये भारताकडूनही सातत्याने मदत केली जात आहे. रासुवा जिल्ह्यातील चिलिमे बोगद्यातील बचावकार्यात भारतीय Tunnel Rescue Team ने नेपाळी लष्करासोबत समन्वय साधत बोगद्यात साचलेले पाणी बाहेर काढण्याचे आणि शाफ्टमध्ये पुढे जाण्याचे काम केले आहे. नेपाळमधील भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे भारताकडून तांत्रिक मदत आणि परिसरातील नागरिकांसाठी मानवतावादी मदत सुरू असल्याचे सांगितले आहे. रासुवा जिल्ह्यातील भोतेकोशी नदीला आलेल्या भीषण पुराला शनिवारी 11 दिवस पूर्ण झाले असून, बचाव आणि मदतकार्य अद्याप सुरू आहे.
