वेळेवर हजर राहा, गणवेश-ओळखपत्र वापरा | व्यसन करताना आढळल्यास थेट निलंबनाचा इशारा
छत्रपती संभाजीनगर : Government Medical College Staff Discipline Rules – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गट-ड अर्थात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या अनियमित कामकाजाला आता चाप बसणार आहे. कर्तव्यावर उशिरा येणे, विनापरवानगी गैरहजर राहणे, गणवेश आणि ओळखपत्र न वापरणे, तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी योग्य पद्धतीने वर्तन न करणे, अशा प्रकारांची गंभीर दखल महाविद्यालय प्रशासनाने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी २ नोव्हेंबरला परिपत्रक जारी करत कर्मचाऱ्यांना शिस्तीचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. महाविद्यालयातील अनेक चतुर्थश्रेणी कर्मचारी कार्यालयीन वेळेत आपल्या नेमून दिलेल्या विभागात वेळेवर उपस्थित राहत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. विनापरवानगी गैरहजेरीचे प्रकारही वारंवार घडत असल्याने दैनंदिन कामकाजासह स्वच्छतेच्या व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी निर्धारित वेळेत कर्तव्यावर उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. विनापरवानगी गैरहजर राहिल्यास संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध तातडीने चौकशी समिती गठीत करून नियमानुसार कठोर शिस्तभंगविषयक कारवाई केली जाणार आहे. तसेच कर्तव्यावर असताना गणवेश आणि ओळखपत्र परिधान करणेही सक्तीचे करण्यात आले आहे.
रुग्णांशी उद्धट वर्तन खपवून घेणार नाही!
रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांशी अत्यंत सौजन्याने व आदराने वागण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी जबाबदारीने वागण्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
दारू, धूम्रपान आणि व्यसनांना कर्तव्यावर बंदी!
सर्वाधिक कडक इशारा व्यसनांच्या बाबतीत देण्यात आला आहे. कर्तव्यावर असताना मद्यपान, धूम्रपान किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे व्यसन करताना कर्मचारी आढळल्यास त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्याची कारवाई केली जाईल, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी दिला आहे.
Read About : District Hospital Advanced X-Ray – जिल्हा रुग्णालयात 30 लाखांचे अत्याधुनिक एक्सरे मशीन
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.