राष्ट्रवादीच्या आमदारांचा भाजप-शिवसेनेविरोधात तक्रारीचा सूर
Mahayuti alliance tensions in Maharashtra मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी ऐकवलेल्या कथित ऑडिओ क्लिपनंतर महायुतीतील मित्रपक्षांमध्ये रंगलेला वाद शमत नाही, तोच राष्ट्रवादी आमदारांनी पक्षाच्या बैठकीत शिवसेना आणि भाजपविषयी नाराजी व्यक्त केल्याने राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील विभागांकडून मतदारसंघातील विकासकामांना मंजुरी मिळत नसल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या आमदारांनी पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यासमोर तक्रारीचा पाढा वाचला. तर भाजपकडूनही राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींना योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोप काही आमदारांनी केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेली अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीत पक्षाचे संघटनात्मक कामकाज, मतदारसंघांतील विकासकामे, निधीची उपलब्धता आणि महायुती सरकारमधील घटक पक्षांकडून मिळणारी वागणूक यावर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत आमदारांनी आपल्या मतदारसंघातील अडचणी, पक्षाच्या कामकाजाबाबतच्या भावना तसेच महायुतीतील मित्रपक्षांबाबत खदखद व्यक्त केल्याचे समजते. आमदार सुनील शेळके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या अखत्यारीतील मंत्र्यांकडून कामे होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच मतदारसंघातील विकासकामांना अपेक्षित मंजुरी मिळत नसल्याने स्थानिक पातळीवर अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून देतानाच, सरकारमध्ये सहभागी असूनही आपल्या कामांना प्राधान्य मिळत नसल्याची खदखद व्यक्त केल्याचे सांगण्यात येते.
विकासकामांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका
आमदार हिरामण खोसकर यांनीही निधी आणि विकासकामांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडत मतदारसंघातील कामे झाली नाहीत आणि विकासासाठी निधी मिळाला नाही, तर निवडून आलेल्या मताधिक्याइतकीच मते घेऊन पराभूत होण्याची वेळ येईल, अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. निवडणुकीच्या वेळी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सरकारमधील घटक पक्षांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे गाऱ्हाणे त्यांनी मांडल्याची माहितीही मिळते.
लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या वागणुकीचा मुद्दा उपस्थित
दुसरीकडे, कळवणच्या आमदार सरोज अहिरे यांनी भाजपकडून राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या वागणुकीचा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगण्यात येते. भाजपकडून कशा प्रकारे अवहेलना केली जाते, याबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली. तर मंत्री मकरंद पाटील यांनी सातारा जिल्हा परिषदेमधील घडामोडींचा संदर्भ देत भाजपच्या दादागिरीचा मुद्दा उपस्थित केल्याचे कळते. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्याने भाजपला मुकाबला देणे शक्य झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिल्याचे सांगण्यात येते. एकंदरीत राष्ट्रवादीच्या आमदारांचा भाजप-शिवसेनेविरोधात तक्रारीचा सूर पाहता महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे.
चित्र बदलले
राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होण्यापूर्वी, अजित पवार यांच्या वित्त खात्याकडून मतदारसंघातील विकासकामांना निधी मिळत नव्हता, असा सूर शिंदे गटाचा होता. ते सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांना पुन्हा वित्त खाते देण्यास शिंदे गटाचा विरोध असल्याचे चित्र त्यावेळी होते. आता अजित पवार यांच्या पश्चात हे चित्र बदलले असल्याचे राष्ट्रवादीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट झाले.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Rahul Gandhi Gyanesh Kumar- ज्ञानेश कुमारांना तुरुंगात जावेच लागेल- राहुल गांधी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.