मराठवाड्याच्या वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी उभारी| घाटीत पीजीच्या ७३ जागांना हिरवा कंदील | २१ चिकित्सालयीन आणि ५२ अचिकित्सालयीन जागांची भर
छत्रपती संभाजीनगर : GMCH Medical Students – वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि घाटीच्या वैद्यकीय शिक्षणाच्या प्रगतीची अपेक्षा बाळगणाऱ्या हजारो नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटीच्या पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमाच्या तब्बल ७३ अतिरिक्त जागांना राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेने (एनएमसी) मंजुरी दिली आहे. ८७ जागा वाढविण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावापैकी ७३ जागांना मंजुरी मिळणे ही घाटीच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाची उपलब्धी मानली जात आहे.
विशेष म्हणजे, यामध्ये २१ चिकित्सालयीन (क्लिनिकल) आणि ५२ अचिकित्सालयीन (नॉन-क्लिनिकल) जागांचा समावेश आहे. याशिवाय डीएम अभ्यासक्रमाच्या आणखी १२ जागा एसएसबीमध्ये लवकरच मंजूर होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे घाटीच्या वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार होण्यासोबतच वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नव्या संधी निर्माण होणार आहेत.
वैद्यकीय पदवी पूर्ण केल्यानंतर एमडी, एमएससारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविणे हे प्रत्येक वैद्यकीय विद्यार्थ्याचे महत्त्वाचे स्वप्न असते. नीट पीजी परीक्षेतील गुणवत्ता, उपलब्ध जागा आणि प्रवेशासाठी असलेली स्पर्धा यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या विषयात प्रवेश मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत घाटीसारख्या शासकीय वैद्यकीय संस्थेत ७३ जागांची वाढ होणे ही गुणवंत विद्यार्थ्यांसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे. या वाढीमुळे अधिक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून, महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेलाही त्याचा फायदा होईल.
८७ जागांचा प्रस्ताव; ७३ जागांवर यश
घाटीमध्ये सध्या एमडी आणि एमएस या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २०० जागा उपलब्ध आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात या सर्व जागांवर १०० टक्के प्रवेश झाले आहेत. यावरून घाटीतील वैद्यकीय शिक्षणाची विश्वासार्हता, उपलब्ध शैक्षणिक सुविधा आणि विविध विभागांमधील प्रशिक्षणाच्या संधी अधोरेखित होतात. वाढती रुग्णसंख्या, आवश्यक तज्ज्ञ मार्गदर्शक आणि वैद्यकीय शिक्षणासाठी उपलब्ध असलेले पोषक वातावरण लक्षात घेऊन पीजीच्या जागा वाढविण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. महाविद्यालय प्रशासनाकडून एकूण ८७ जागा वाढविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यापैकी ७३ जागांना एनएमसीने मंजुरी दिली आहे. म्हणजेच घाटीच्या पदव्युत्तर प्रवेश क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. उर्वरित जागांसाठीही भविष्यात प्रयत्न करण्याची संधी कायम आहे.
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांनाही मिळणार बळ
एमबीबीएसनंतर पुढील शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. उपलब्ध जागांची मर्यादा आणि प्रवेशासाठीची तीव्र स्पर्धा यामुळे अनेकांना आपल्या आवडीच्या शाखेपासून दूर राहावे लागते. आता घाटीमध्ये ७३ अतिरिक्त जागा उपलब्ध झाल्याने अधिक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणाची संधी मिळू शकते. घाटीच्या वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने एमबीबीएसच्या आणखी ५० जागा वाढविण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मध्ये एमबीबीएच्या ५० जागा वाढतील, अशी अपेक्षा आहे. एमबीबीएसच्या जागा वाढल्यास पदवी वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अधिक संधी उपलब्ध होऊ शकतील.
डॉ. शिवाजी सुक्रे (अधिष्ठाता)
१० विभागांत वाढ; विद्यार्थ्यांना विषय निवडीचे अधिक पर्याय
या वाढीचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे वैद्यकीय शिक्षणाच्या विविध शाखांमध्ये जागा उपलब्ध होणार आहेत. शरीररचनाशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, जैवरसायनशास्त्र यांसारख्या मूलभूत वैद्यकीय विज्ञान शाखांपासून ते बालरोग, नेत्ररोग आणि मानसोपचारशास्त्रासारख्या क्लिनिकल शाखांपर्यंत जागांची वाढ करण्यात आली आहे. शरीररचनाशास्त्र ९ जागा, शरीरक्रियाशास्त्र १८ जागा, जैवरसायनशास्त्र १५ जागा, औषधनिर्माणशास्त्र ६ जागा, सूक्ष्मजीवशास्त्र २ जागा, न्यायवैद्यकशास्त्र (एफएमटी) २ जागा, समुदाय वैद्यकशास्त्र (पीएसएम) १० जागा, मानसोपचारशास्त्र २ जागा, नेत्ररोगशास्त्र ४ जागा, बालरोगशास्त्र ५ जागा. अशा एकूण १० विभागांतील ७३ जागांना मंजुरी मिळाली आहे.
निवासी डॉक्टर वाढल्याने रुग्णसेवेलाही हातभार
पीजीच्या जागा वाढण्याचा फायदा केवळ विद्यार्थ्यांना होणार नाही, तर त्याचा सकारात्मक परिणाम सर्वसामान्य रुग्णांवरही होण्याची अपेक्षा आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, आपत्कालीन सेवा, विविध तपासण्या आणि शस्त्रक्रिया अशा अनेक स्तरांवर डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका असते. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे निवासी डॉक्टर वैद्यकीय शिक्षणासोबतच रुग्णसेवेतही सक्रिय सहभाग घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास विविध विभागांतील वैद्यकीय मनुष्यबळाला मदत मिळू शकते. रुग्णांची तपासणी, उपचारांचे नियोजन आणि वैद्यकीय सेवांच्या उपलब्धतेत अधिक बळकटी येण्याची अपेक्षा आहे. अर्थात, या वाढीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी आवश्यक शिक्षक, पायाभूत सुविधा आणि इतर संसाधनेही उपलब्ध असणे महत्त्वाचे ठरणार आहे.
डीएमच्या १२ जागांचीही प्रतीक्षा
पीजीच्या ७३ जागांना मंजुरी मिळाल्यानंतर आता घाटीच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची अपेक्षा निर्माण झाली आहे. डीएम अर्थात डॉक्टर ऑफ मेडिसिन या अतिविशेषोपचार अभ्यासक्रमाच्या आणखी १२ जागा एसएसबीमध्ये मंजूर होऊन येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या जागांना मंजुरी मिळाल्यास उच्चस्तरीय वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक मोठी संधी निर्माण होईल. अतिविशेषोपचार क्षेत्रात तज्ज्ञ डॉक्टर घडविण्याच्या प्रक्रियेलाही त्यामुळे चालना मिळू शकेल.
Read About : Mbbs Bds Special Stray Vacancy Round – वैद्यकीय प्रवेशाची आणखी एक संधी!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.