Ad Advertisement Ad Advertisement

Marathwada Water Crisis – मराठवाड्यात 560 टँकरद्वारे पाणीपुरवठा

पंधरा दिवसांत तब्बल १०० टँकरची भर

छत्रपती संभाजीनगर : Marathwada Water Crisis – मराठवाड्यात दिवसेंदिवस दुष्काळाच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहेत. पाणी टंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला असून आजघडीला पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या विभागातील ३५३ गावे आणि २३३ वाड्यांना ५६० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यावरून केवळ पंधरा दिवसांत तब्बल १०० टँकरची भर पडल्याचे दिसून येत आहे. सुदैवाने विभागातील चार जिल्हे अद्याप टँकरमुक्त आहेत.

मराठवाड्यात यावर्षी मार्चपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली. उन्हाळ्यात तहानलेल्या गावात टप्प्याटप्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करावा लागला. पावसाळा सुरू झाल्यावर टँकरचा प्रश्न निकाली लागेल, अशी अपेक्षा होती. परंतु सर्वदूर अपेक्षित पाऊस झाला नाही आणि जलस्रोत आटलेल्या गावांची तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना टँकरचा आधार घ्यावा लागला आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परभणी वगळता विभागातील उर्वरित सात जिल्ह्यांतील एकूण २५७ गावे आणि १३० वाड्यांना ४२८ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू होता. जुलै महिन्यात झालेल्या पावसानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात टँकरच्या संख्येत घट झाली होती.

सप्टेंबर अखेर विभागातील १५७ गावे आणि १०३ वाड्यांना २९५ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. केवळ २० दिवसांत टंँकरच्या संख्येत दुप्पट वाढ झाली. २० ऑक्टोबर दरम्यान विभागात २५५ गावे आणि १८२ वाड्यांना ४४१ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुुरू होता. अपुऱ्या पावसामुळे दिवसेंदिवस पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. विभागातील ३५३ गावे आणि २३३ वाड्यांना ५६० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

सर्वाधिक टँकर बीडमध्ये

सर्वाधिक गंभीर परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील १७२ गावे आणि १८३ वाड्यांना २९४ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११९ गावे आणि ३४ वाड्यांना मिळून १७९ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. जालना जिल्ह्यातील ४९ गावे आणि १६ वाड्यांना ६८ टँकरद्वारे तर धाराशिव जिल्ह्यातील १३ गावांतील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी १९ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, ना्ंदेड आणि लातूर ही चार जिल्हे सुदैवाने अद्याप तरी टँकरमुक्त आहेत.

९१७ विहिरींचे अधिग्रहण

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन हिंगोली, नांदेड हे दोन जिल्हे वगळून मराठवाड्यातील उर्वरित सहा जिल्ह्यांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ३ नोव्हेंबरच्या अहवालानुसार एकूण ९१७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७४, जालना ७५, परभणी १९, बीड १०३, लातूर ३०२, तर धाराशिव जिल्ह्यातील ३४४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे

Read About : Husband Suicide After Wife Affair – पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची सासरवाडीतच आत्महत्या
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.