इल्युमिनाची निवड, जनुकीय माहितीवर आधारित वैयक्तिक उपचारांना मिळणार चालना
सिंगापूर : Singapore DNA Mapping Project – एखाद्या व्यक्तीला भविष्यात कोणत्या आजारांचा धोका असू शकतो, कोणते उपचार तिच्यासाठी अधिक परिणामकारक ठरू शकतात आणि आजारांची लक्षणे दिसण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाय कसे करता येतील, याची उत्तरे आता जनुकांच्या अभ्यासातून शोधली जाणार आहेत. सिंगापूरने यासाठी मोठी आरोग्यविषयक मोहीम हाती घेतली असून, तब्बल ४ लाख ५० हजार नागरिकांचे संपूर्ण जनुकीय विश्लेषण केले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जागतिक कंपनी इल्युमिनाची निवड करण्यात आली आहे.
४.५ लाख नागरिकांच्या जनुकांचा अभ्यास
सिंगापूरच्या नॅशनल प्रिसीजन मेडिसिन (एनपीएम) कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात ‘एसजी-इनसाइट’ हा अभ्यास राबविण्यात येणार आहे. देशातील प्रत्येक दहा नागरिकांमागे एका नागरिकाचा या संशोधनात समावेश होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वीच्या टप्प्यात प्रामुख्याने निरोगी स्वयंसेवकांच्या जनुकांचा अभ्यास करण्यात आला होता. मात्र, आता विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचाही समावेश केला जाणार आहे.
उपचारपद्धतीत होणार मोठा बदल
जनुकीय माहिती आणि रुग्णांच्या प्रत्यक्ष आरोग्यविषयक नोंदी यांची सांगड घालून आजारांची कारणे, उपचारांना मिळणारा प्रतिसाद आणि संभाव्य आरोग्यधोके समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात व्यक्तीच्या जनुकीय रचनेनुसार प्रतिबंधात्मक उपाय आणि अधिक अचूक उपचार विकसित करण्यास मदत होईल. इल्युमिना सिंगापूरमधील स्वत:च्या जीनोमिक्स केंद्रात ही प्रक्रिया पूर्ण करणार आहे. या केंद्रात नमुन्यांची तयारी, सिक्वेन्सिंग आणि जनुकीय माहितीचे विश्लेषण केले जाईल.
आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती?
इल्युमिनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेकब थायसेन यांनी राष्ट्रीय स्तरावर प्रिसीजन मेडिसिन विकसित करण्याच्या सिंगापूरच्या प्रयत्नांचे कौतुक केले. प्रीसाइजचे कार्यकारी संचालक प्रा. पॅट्रिक टॅन यांनी जनुकीय, जीवनशैलीविषयक आणि पर्यावरणीय घटकांचा आरोग्यावर होणारा परिणाम समजून घेणे हा या संशोधनाचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे, इल्युमिनाने २००८ मध्ये सिंगापूरमध्ये काम सुरू केले असून, यापूर्वीच्या टप्प्यात एक लाखांहून अधिक नागरिकांच्या जनुकांचे सिक्वेन्सिंग करण्यास सहकार्य केले आहे. भविष्यात आजारावर उपचार करण्यापेक्षा तो होण्याचा धोका आधीच ओळखणे अधिक महत्त्वाचे ठरू शकते. जनुकांमधील संकेत समजून घेणारे हे संशोधन वैद्यकीय क्षेत्राला उपचारांच्या नव्या युगाकडे घेऊन जाणारे ठरू शकते.
Read About: Breast Cancer Awareness Program – स्तनाच्या कर्करोगाबाबत गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.