अयोध्येत दहाव्या दीपोत्सवाचा भव्य सोहळा; उपराष्ट्रपतींची उपस्थिती
अयोध्या : Ayodhya Deepotsav – प्रभू श्रीरामची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत दहाव्या दीपोत्सवाचा नयनरम्य असा सोहळा शनिवारी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सरयू नदीच्या काठावरील ५६ घाटांवर विक्रमी ३० लाखांहून अधिक मातीचे दिवे प्रज्वलित करण्यात आले. उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह विविध नेते व मंत्री दीपोत्सवाच्या सोहळयाला हजर होते.
उपराष्ट्रपतींनी दीपोत्सवाला सुरूवात करण्यापूर्वी प्रभू श्रीरामाचा राज्याभिषेक करत पूजा-अर्चना केली. यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. लाखो दिव्यांच्या प्रकाशाने अध्योधानगरी उजळून निघाली. तब्बल ३० लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्याचा जागतिक विक्रम गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंदवण्यात आला. सरयू नदीच्या काठवरील ५६ घाटांवर हे दिवे लावण्यात आले होते. याशिवाय सरयूच्या नदीकिनाऱ्याबरोबर राम की पेडी परिसरात आकर्षक लेझर शोचे आयोजन करण्यात आले. लेझर व ड्रोनच्या मदतीने आसमंतात रामायणातील प्रसंग साकारण्यात आले. याशिवाय लाईट अँड साउंड शो देखील सादर करण्यात आला.
अयोध्येच्या पवित्र भूमीत आयोजित या मंगलमय सोहळयाला उपस्थित राहण्याची संधी मिळणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, अशी भावना उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली. प्रभू श्रीराम हे धर्म, सदाचार, करुणा आणि आदर्श आचरणाचे शाश्वत प्रतीक असल्याचे ते म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी हे श्रीरामांनी दाखवलेल्या मार्गावरच वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भव्य शोभायात्रा
दीपोत्सवानिमित्त अयोध्यानगरीत सुमारे तीन तास भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात २१ चित्ररथांचा समावेश होता. रामायणातील सात कांडांचे दर्शन या चित्ररथांमधून घडविण्यात आले. ५६ घाटांवर आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली. पारंपारिक नृत्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी या सोहळयात रंगत आणली. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी देशभरातून भाविक आणि पर्यटक मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रभू रामचंद्र हे भारताचा आत्मा आणि राष्ट्रीय चेतनेचा पाया-राज्यपाल आनंदीबेन पटेल
प्रभू रामचंद्र हे केवळ एक नाव नसून ती एक मूल्यव्यवस्था, भारताचा आत्मा आणि आपल्या राष्ट्रीय चेतनेचा पाया आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केले. यावेळी त्यांनी अयोध्येच्या वाढत्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वावर प्रकाश टाकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री योगी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्या आपली प्राचीन आध्यात्मिक ओळख जपत आधुनिक विकासाची नवी शिखरे सर करत आहे. अयोध्येत भाविक आणि पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत असल्याने स्थानिक रोजगार आणि आर्थिक समृद्धीच्या अथांग संधी निर्माण झाल्या आहेत.
हॉटेल, वाहतूक, हस्तकला आणि पूजा साहित्याशी संबंधित हजारो कुटुंबांना यामुळे नवी उपजीविका मिळाली आहे. प्रभू रामांचे जीवन आपल्याला हक्कांपेक्षा कर्तव्याला आणि भौतिक समृद्धीपेक्षा चारित्र्याला प्राधान्य देण्याची शिकवण देते. रामराज्याची संकल्पना ही केवळ एक आदर्श शासन प्रणाली नसून न्याय, समानता, करुणा आणि लोककल्याण यावर आधारित समाज निर्माण करण्याची ती एक कटिबद्धता आहे, असे राज्यपाल म्हणाल्या. तरुणांनी प्रभू रामांच्या जीवनातून शिस्त आणि कर्तव्यभावनेची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन करत त्यांनी जगभरातील रामभक्तांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
Read About : Air Force Creates History – चीन सीमेजवळ वायुदलाची विक्रमी लँडिंग !
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.