घाटीत डॉक्टरांनी फुफ्फुसात अडकवलेला बदाम काढला
छत्रपती संभाजीनगर :Ghati Hospital Bronchoscopy Almond Removed Child – सर्वत्र दिवाळीचा उत्साह, आनंद आणि रोषणाईची धामधूम सुरू असताना छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) मात्र एका चिमुकल्यासाठी ही दिवाळी जीवनदानाची पहाट ठरली. अवघ्या एक वर्षे दहा महिन्यांच्या चिमुकल्याच्या फुफ्फुसात खाताना बदाम अडकल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली होती. श्वास घेण्यास त्रास, सततचा खोकला आणि उलट्यांमुळे चिमुकल्याची अवस्था चिंताजनक बनली होती. अशा कठीण परिस्थितीत घाटीतील डॉक्टरांनी तातडीने उपचार करत ब्रॉन्कोस्कोपीद्वारे श्वसनमार्गात अडकलेला बदाम बाहेर काढला. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे या चिमुकल्याला जणू मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत नवजीवन मिळाले.
७ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास या चिमुकल्याने खाताना अनावधानाने बदाम गिळला. मात्र, हा बदाम अन्ननलिकेत न जाता श्वसनमार्गात अडकल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. खोकला आणि उलट्यांचा त्रासही जाणवू लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नातेवाइकांनी त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. तपासणीदरम्यान दोन्ही फुफ्फुसांमध्ये हवेचा प्रवेश कमी झाल्याचे तसेच श्वास घेताना छातीच्या वरच्या भागात जोर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले.
चिमुकल्याची प्रकृती लक्षात घेता त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासाची मदत द्यावी लागली. त्याला वॉर्ड क्रमांक २५ मध्ये दाखल करून श्वसनमार्गात अडकलेला परकीय पदार्थ बाहेर काढण्यासाठी ब्रॉन्कोस्कोपी करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवाळीची सुट्टी आणि सणाचा दिवस असतानाही घाटीतील डॉक्टरांनी तत्परता दाखवत उपचारांची तयारी केली. अखेर यशस्वी प्रक्रियेद्वारे श्वसनमार्गात अडकलेला बदाम बाहेर काढण्यात आला. त्यामुळे चिमुकल्याच्या उपचारांना मोठे यश मिळाले असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
डॉक्टरांची तत्परता, संपूर्ण टीमचे प्रयत्न
घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कान-नाक-घसा विभागाने ही उपचारप्रक्रिया पार पडली. यामध्ये बालरोग पथकप्रमुख, बधिरीकरणशास्त्र विभाग, ईएनटी विभाग यांच्यासह निवासी डॉक्टर आणि ओटी-१ मधील कर्मचारी व परिचारकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, लहान मुलांना बदाम, शेंगदाणे, काजू यांसारखे कडक ड्रायफ्रूट देताना पालकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. या वयातील मुलांची चावण्याची आणि गिळण्याची क्षमता पूर्णपणे विकसित झालेली नसते.
त्यामुळे असे पदार्थ श्वसनमार्गात अडकण्याचा धोका असतो. विशेषत: लहान मुलांना संपूर्ण बदाम किंवा कडक सुकामेवा देणे टाळावे. वयानुसार योग्य स्वरूपात आणि मोठ्यांच्या देखरेखीखालीच आहार द्यावा. कारण क्षणभराचा निष्काळजीपणा चिमुकल्याच्या जीवावर बेतू शकतो, असे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.
Read About : Government Medical College Staff Discipline Rules – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मनमानीला लगाम!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.