Ad Advertisement Ad Advertisement

Anti-Jamming FPV Drone – लडाखमध्ये 18000 फूट उंचीवर ‘अद्विक’ ड्रोनची यशस्वी चाचणी

‘अद्विक’ कामीकाझे ड्रोनने प्रतिकूल हवामानातही रेडिओ फ्रिक्वेन्सी जॅमिंगवर मात करत संपर्क कायम ठेवल्याचा कंपनीचा दावा.

सुरत : Anti-Jamming FPV Drone गुजरातमधील संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘इन्साइड एफपीव्ही’ या भारतीय कंपनीने मोठी कामगिरी केली आहे. लडाखमधील सुमारे १८,००० फूट उंचीवर आपल्या ‘अद्विक’ या स्वदेशी कामीकाझे एफपीव्ही ड्रोनची यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे. अशी यशस्वी चाचणी घेणारी इन्साइड एफपीव्ही ही पहिली भारतीय कंपनी ठरली असून हे आधुनिक ड्रोन भारतीय लष्कराला सुपूर्द करण्यात आले आहेत.

आधुनिक युद्धात (उदा. युक्रेन युद्धादरम्यान) शत्रूकडून रेडिओ फ्रिक्वेन्सी जॅमरचा वापर करून ड्रोन आणि ऑपरेटरमधील संपर्क तोडला जात आहे. त्यामुळे ड्रोन निकामी होतात. इन्साइड एफपीव्हीने बाजारातून रेडिओ फ्रिक्वेन्सी विकत न घेता, स्वत:चे इन-हाउस ‘आरएफ कम्युनिकेशन स्विचिंग लिंक’ आणि ॲन्टेना रॅक सिस्टीम विकसित केली आहे.

रेडिओ फ्रिक्वेन्सी जॅम तरीही संपर्क कायम

चाचणीदरम्यान अत्याधुनिक ड्रोन संरक्षण यंत्रणासारख्या जॅमर यंत्रणा सुरू असतानाही ड्रोनने आपले नियंत्रण आणि संपर्क यशस्वीरीत्या कायम ठेवले.

अतिउंचीवर उत्कृष्ट कामगिरी

१८,००० फूट उंचीवर हवेची विरळता, कमी ऑक्सिजन आणि प्रतिकूल हवामानामुळे बॅटरी व प्रोपेसरची कार्यक्षमता घटते. इनसाईड एफपीव्ही कंपनीने अत्यंत कमी वजनामध्ये आणि खिशाला परवडणाऱ्या किमतीत अँटी-जॅमिंग क्षमता विकसित केली आहे. जर हे तंत्रज्ञान लडाखमध्ये यशस्वी ठरते, तर ते देशाच्या कोणत्याही सीमेवर उत्तम काम करू शकते, असा दावा कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी देववंत भारद्वाज यांनी केला आहे.

भारतीय लष्करासाठी महत्त्व

मेजर जनरल विकास शर्मा (निवृत्त) यांच्या मते, आधुनिक युद्धात तंत्रज्ञानासोबतच ड्रोन्सच्या संख्येला मोठे महत्त्व आहे. अचूक हल्ल्यांसाठी भारताला सुमारे १ लाख कमी खर्चाच्या कामीकाझे ड्रोन्सची गरज आहे, ज्यांची निर्मिती केवळ स्वदेशी पातळीवरच मोठ्या प्रमाणात होऊ शकते. अमेरिकेसारख्या देशांमध्येही आता जॅमिंगवर मात करणाऱ्या ड्रोन्सवर भर दिला जात असताना, भारताने हे तंत्रज्ञान देशांतर्गत विकसित करणे हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.

‘इन्साइड एफपीव्ही’ बद्दल…

२०२० मध्ये स्थापन झालेली ‘इन्साइड एफपीव्ही व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही सुरत (गुजरात) मुख्यालय असलेली भारतीय संरक्षण तंत्रज्ञान कंपनी आहे. ही कंपनी कामीकाझे एफपीव्ही ड्रोन, लॉयटरिंग म्युनिशन आणि इंटरसेप्टर यंत्रणेची निर्मिती व निर्यात करते.

Read About : Muhurat Trading 2026- दिवाळीनिमित्त शेअर बाजारात विशेष मुहूर्त ट्रेडिंग!
E-Paper: Punyanagari E-Paperआर्थिक

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.