Ad Advertisement Ad Advertisement

US Data Center Investment – अमेरिकेत डेमोक्रॅट्सच्या विजयामुळे डेटा सेंटर प्रकल्प अडचणीत?

टेक्सास, जॉर्जिया आणि ओहायोमधील राजकीय बदलांमुळे एआय पायाभूत सुविधांच्या विस्तारावर निर्बंध येण्याची शक्यता

नवी दिल्ली : US Data Center Investment अमेरिकेतील मध्यवधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने मिळवलेल्या विजयामुळे तिथल्या १४१ गिगावॉट क्षमतेच्या नियोजित डेटा सेंटर प्रकल्पांवर नवीन धोरणात्मक निर्बंध येण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीचा वेग मंदावू शकतो, तर दुसरीकडे अमेरिकी ट्रेझरी बॉण्ड्सना याचा फायदा होऊन त्यांचे उत्पन्न (बाँड यील्ड) कमी होऊ शकते, असा अंदाज आयसीआयसीआय बँकेच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

टेक्सास, जॉर्जिया आणि ओहायो या तीन राज्यांच्या राज्यपालपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक उमेदवारांनी विजय मिळवला आहे. हे तीन राज्ये मिळून अमेरिकेतील एकूण कार्यरत आणि नियोजित डेटा सेंटर क्षमतेच्या ३३% (एकूण १५६ गिगावॅट) वाटा सांभाळतात.
या तीन राज्यांमध्ये १५६ गिगावॅट क्षमतेपैकी सध्या केवळ १५ गिगावॅट प्रकल्प कार्यरत आहेत, तर १४१ गिगावॅटचे प्रकल्प अद्याप नियोजित टप्प्यात आहेत. एकट्या टेक्सासचा राष्ट्रीय क्षमतेत २२%, जॉर्जियाचा ५% आणि ओहायोचा ६% वाटा आहे.

डेटा सेंटरला विरोध का?

नवनिर्वाचित राज्यपालांनी निवडणुकीच्या प्रचारात वीज आणि पाण्याचा प्रचंड वापर, वाढता वापर खर्च आणि स्थानिक समुदायांवर होणारा परिणाम या कारणांवरून नवीन डेटा सेंटर प्रकल्पांवर निर्बंध घालण्याचे आश्वासन दिले होते. आयसीआयसीआय बँकेच्या अहवालानुसार, या धोरणात्मक बदलांमुळे एआयमधील गुंतवणूक संपूर्णपणे थांबणार नाही, परंतु पुढील डेटा सेंटर गुंतवणुकीचा वेग निश्चितच मंदावू शकतो.

ट्रेझरी मार्केटसाठी दिलासा

एआय क्षेत्रातील बिग टेक कंपन्यांचा भांडवली खर्च आणि कर्ज घेण्याचे प्रमाण कमी झाल्यास त्याचा अमेरिकी ट्रेझरी बाजाराला मोठा फायदा होईल. गुंतवणूक कमी झाल्यामुळे आर्थिक विकास आणि महागाईचा दबाव नियंत्रणात राहू शकतो, ज्यामुळे फेडरल रिझर्व्हला पुढील व्याजदर वाढ करण्याची गरज भासणार नाही.

बॉण्ड यील्ड मध्ये घसरण

निवडणुकीच्या निकालानंतर अमेरिकेच्या २ वर्षांच्या ट्रेझरी यील्डमध्ये ९ बेसिस पॉईंट्सची घसरण होऊन ते ४.५४% वर आले (नंतर ते ४.५९% वर स्थिरावले). तर १०-वर्षांचे यील्ड ७ बेसिस पॉईंट्सने घसरून ४.८९% पर्यंत खाली आले (नंतर ४.९१% वर स्थिरावले).

डॉलर निर्देशांक कमकुवत

एआय क्षेत्रातील कडक नियमावली आणि आर्थिक विकासावरील परिमाणाच्या भीतीमुळे डॉलर निर्देशांकही कमकुवत झाला आहे.

पश्चिम आशियातील तणाव

डेमोक्रॅटिक पक्षाच्या मजबूत कामगिरीमुळे सरकारवर पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी दबाव वाढेल, ज्यामुळे बाजाराला आणखी पाठबळ मिळेल, असा निष्कर्ष आयसीआयसीआय बँकेने नोंदवला आहे.

Read About : Women Prefer Warmer Temperatures : महिलांना पुरुषांपेक्षा उबदार वातावरण का आवडते?
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.