Scorpio Rooftop : चोरीच्या भीतीने महागडी कार थेट दुसऱ्या मजल्यावर

चालकाने नोकरी सोडल्यानंतर कुटुंबीयांना कारच्या सुरक्षेची चिंता, व्हिडिओ व्हायरल

Scorpio Rooftop गोपालगंज : कार चोरीला जाऊ नये म्हणून बिहारमधील एका व्यक्तीने चक्क आपली नवी कार (एसयूव्ही) घराच्या दुसऱ्या मजल्यावरील छतावर ठेवण्याचा निर्णय घेतला. गोपालगंज येथील ही अनोखी घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्कॉर्पिओ क्रेनच्या साहाय्याने हवेत उचलताना दिसते. दोन मजली घराच्या छतापर्यंत वाहन हळूहळू नेण्यात आले आणि त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक गच्चीवर उतरवण्यात आले.

ही कार मनोज यादव यांनी नुकतीच खरेदी केली होती. यादव इस्रायलमध्ये काम करतात. परदेशात असताना त्यांनी कारची जबाबदारी एका चालकाकडे सोपवली होती. मात्र, चालकाने नंतर नोकरी सोडल्याने कारच्या सुरक्षेबाबत कुटुंबीयांना चिंता वाटू लागली.

चोरीचा धोका टाळण्यासाठी कुटुंबीयांनी वाहन थेट छतावर नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, छताची वाहनाचे वजन पेलण्याची क्षमता किंवा अशा प्रकारे कार ठेवण्याच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. स्थानिकांच्या माहितीनुसार, ‘गच्चीवर कार हे दृश्य सध्या ऑनलाइन चर्चेचा विषय बनले आहे.