Ad Advertisement Ad Advertisement

2026 among hottest years on record – २०२६ असेल इतिहासातील सर्वाधिक उष्ण वर्षांपैकी एक

जागतिक तापमानवाढीबाबत ‘डब्लूएमओ’चा धोक्याचा इशारा

नवी दिल्ली : 2026 among hottest years on record जागतिक हवामान संघटनेच्या(डब्ल्यूएमओ) ताज्या अहवालानुसार, २०२६ हे वर्ष आजवरच्या नोंदींमधील सर्वाधिक उष्ण चार वर्षांपैकी एक ठरण्याची दाट शक्यता आहे. तुर्किए येथील अंताल्या शहरात सुरू असलेल्या ‘कॉप३१’ या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘स्टेट ऑफ द क्लायमेट’ हा अहवाल जाहीर करण्यात आला. या अहवालानुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत जागतिक सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या तुलनेत १.४७ अंश सेल्सिअसने अधिक नोंदवले गेले आहे. हे तापमान २०२३ आणि २०२५ च्या वार्षिक सरासरीपेक्षा जास्त असून, इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरलेल्या २०२४ च्या तुलनेत किंचितच कमी आहे.

ऑगस्ट महिन्यापासून अधिक तीव्र झालेल्या ‘एल निनो’ या हवामान प्रणालीमुळे २०२६ च्या अखेरपर्यंत ही तापमानवाढ आणखी वाढण्याची भीती आहे. ‘डब्लूएमओ’च्या सरचिटणीस सेलेस्टे साउलो यांनी सांगितले की, गेल्या १७७ वर्षांच्या हवामान नोंदींमध्ये मागील चार वर्षे सर्वाधिक उष्ण राहिली असून, समुद्रातील उष्णतेने सलग दहाव्या वर्षी नवा विक्रम केला आहे. हरितगृह वायूंचे वाढते प्रमाण आणि पृथ्वीच्या ऊर्जा संतुलनातील बिघाड यामुळे जागतिक तापमानात सातत्याने वाढ होत आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण १७५० मधील २७८ पीपीएमवरून ५३ टक्क्यांनी वाढून २०२५ मध्ये ४२६.८ पीपीएमवर पोहोचले आहे.

मानवी जीवनावर गंभीर परिणाम

या वाढत्या उष्णतेचा आणि प्रतिकूल हवामानाचा मानवी जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. युरोपमधील उष्णतेची लाट, दुष्काळ आणि वणव्यांमुळे प्राथमिक अंदाजानुसार ३०,००० हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे, तर भारतात एप्रिल २०२६ मध्ये आलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेचा तब्बल १४.६५ कोटी लोकांना फटका बसला आहे.

धोकादायक कालखंडात प्रवेश

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. आपण हवामानाच्या अत्यंत धोकादायक कालखंडात प्रवेश केला असून, मानवनिर्मित हवामान बदलांमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी जागतिक नेत्यांनी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे, असे गुटेरेस म्हणाले.

Read About : Delhi Air Pollution – वाहनांचा धूर हाच वायू प्रदूषणाचा मुख्य घटक
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.