जीवघेण्या प्रदूषणाचा खरा फटका रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांना बसतोय
नवी दिल्ली : Delhi Air Pollution दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) वाढत्या वायू प्रदूषणासाठी वाहनांमधून निघणारा धूर हाच सर्वात मोठा कारणीभूत घटक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारच्या सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. हवेची गुणवत्ता खालावत चालल्याने वाढता ‘एक्यूआय’ रोखण्यासाठी तातडीच्या, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांची गरज असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
वायू प्रदूषणाशी संबंधित नियामक चौकटीचा आढावा घेण्यासाठी स्वत:हून दखल घेत सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहाना यांच्या खंडपीठाने दिल्ली-एनसीआरमधील ‘बंपर-टू-बंपर’ वाहतूक कोंडीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, आपण फक्त बोलत राहतो आणि सूचना करत राहतो, पण वास्तव हे आहे की, प्रदूषणाचा निर्देशांक (एक्यूआय) आधीच ४०० च्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. दिल्लीला गाझियाबाद, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम आणि फरिदाबादसारख्या शेजारील भागांशी जोडणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी असते, हीच सर्वात मोठी समस्या असल्याचे खंडपीठाने नमूद केले. या जीवघेण्या प्रदूषणाचा खरा फटका रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांना बसत असल्याचे सांगत न्यायालयाने मानवी दृष्टिकोनही मांडला. सणासुदीचा काळ हाच या गरीब लोकांच्या उपजीविकेचा मुख्य काळ असतो, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.
दरम्यान, शेतातील पिकांचे अवशेष जाळण्याच्या समस्येवर बोलताना, शेतकऱ्यांना धसकटाला आग लावण्याऐवजी आधुनिक यंत्रसामग्री वापरण्याबाबत शिक्षित करण्याची गरज खंडपीठाने अधोरेखित केली. तसेच हवेची गुणवत्ता खालावल्यास शाळा बंद ठेवण्याच्या किंवा हायब्रीड मोडमध्ये वर्ग चालवण्याच्या मागणीवर आम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच निर्णय घेऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी सांगितले की, औद्योगिक उत्सर्जन, वाहनांचे प्रदूषण, बांधकाम धूळ, रस्त्यावरील धूळ आणि शेतातील कचरा जाळणे अशा पाच प्रमुख क्षेत्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियामक यंत्रणा काम करत आहे. काही ठरावीक वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालणे, पीयूसी प्रमाणपत्रांचे जिओ-टॅगिंग करणे आणि ॲप्स किंवा सोशल मीडियावरील तक्रारींच्या आधारे प्रदूषण पसरवणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करणे यांसारख्या उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी काही आवश्यक आदेश जारी करण्याचे संकेत दिले असून, दिवाळीच्या सुट्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी यावर पुढील सुनावणी घेतली जाईल.
वायू गुणवत्ता निर्देशांक ३९१ वर
राजधानी दिल्लीवर बुधवारी धुक्याची आणि धुराची गडद चादर पसरली होती. शहरातील एकूण वायू गुणवत्ता निर्देशांक ३९१ वर पोहोचल्याने परिस्थिती ‘अतिशय गंभीर’ श्रेणीच्या उंबरठ्यावर आली आहे. दिल्लीतील ५९ मॉनिटरिंग स्टेशनपैकी ३० स्टेशनवर सकाळी ९ वाजता हवेची गुणवत्ता ‘गंभीर’ नोंदवली गेली, तर उर्वरित ठिकाणी ती ‘खूप खराब’ होती. यामध्ये रोहिणी भागात सर्वाधिक ४७५ तर आयआयटी दिल्ली परिसरात ४७२ एक्यूआयची नोंद झाली आहे.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Ancient Indian Monsoon – हजारो वर्षांपूर्वी भारतात होता तीव्र मान्सून!
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.