कतारचे पंतप्रधान अमेरिकेत दाखल : ट्रम्प म्हणाले, चर्चेत प्रगती झाल्यास हल्ले नाहीत
तेहरान : Iran War Diplomacy अमेरिका पुन्हा इराणवर हल्ले चढविण्याची शक्यता समोर येताच मुत्सद्देगिरीला वेग आला असून, कतारचे पंतप्रधान अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांना भेटण्यासाठी अमेरिकेत डेरेदाखल झाले आहेत.
अमेरिका जोपर्यंत नौदल नाकेबंदी उठवत नाही, गोठवलेली मालमत्ता मुक्त करत नाही आणि निर्बंध हटवत नाही तोपर्यंत शांततेच्या दिशेने मार्गक्रमण अशक्य असल्याचे सांगताना अमेरिका शब्द पाळत नसल्याचा आरोप इराणने केला आहे. दुसरीकडे ट्रम्प यांनी चर्चेत होर्मुझ सामुद्रधुनी खुली करणे आणि इराणच्या अणुकार्यक्रमाविषयी प्रगती झाल्यास इराणवर पुन्हा हवाई हल्ले होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे सांगितले आहे.
इराणची धमकी
अमेरिका इराणवर पुन्हा हवाई हल्ले सुरू करण्याची चर्चा जोर धरू लागल्याच्या पार्श्वभुमिवर इराणची प्रतिक्रिया आली आहे. अमेरिकेने पुन्हा हल्ले केल्यास त्यांची अवस्था नरकासारखी करू, अशी धमकी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी दिली आहे.
वाटाघाटी सुरूच
कतारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इराणविरुद्ध सुरू असलेले अमेरिका-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी वाटाघाटी अजूनही सुरू आहेत आणि वादाचे मुख्य मुद्दे मध्यस्थांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एदोर्गान यांनी म्हटले आहे की, त्यांना इराणवर अमेरिका-इस्रायलचा नवा हल्ला पाहायचा नाहीये; त्यांनी अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा करताना आपली चिंता व्यक्त केली. चीनचे मध्यपूर्वेसाठीचे विशेष दूत झाई जुन यांनी इराण भेटीदरम्यान, इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे उपसचिव अली बघेरी कानी यांची भेट घेतली.
१० दिवसांत ११ टँकर्सवर हल्ला
आपण गेल्या १० दिवसांत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या किमान ११ टँकर्सवर हल्ला केल्याचा दावा इराणच्या नौदलाने केला आहे. नौदलाने इंधन टँकर्स आणि त्यांच्या नेव्हिगेशन प्रणाली निष्क्रिय केल्या, असे वृत्त तस्निम या निम-सरकारी वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. मात्र, हल्ल्याच्या पद्धतींबद्दल त्यात कोणताही तपशील दिलेला नाही.
Read About : Lashkar Maritime Training Near Karachi – पाक समुद्र मार्गे भारतावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.