जागतिक व्यवहारांचे मूल्य ७८१ अब्ज डॉलरवर; अमेरिकेतील व्यवहारांमध्ये ४४.६ टक्क्यांची घसरण, मोठ्या व्यवहारांची संख्या कमी
नवी दिल्ली : Global M&A जगभरातील कंपन्यांमधील विलीनीकरण आणि अधिग्रहण (एम अँड ए) व्यवहारांना २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत मोठा फटका बसला आहे. एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या अहवालानुसार, या कालावधीत जागतिक व्यवहारांचे एकूण मूल्य मागील तिमाहीच्या तुलनेत ३६.९ टक्क्यांनी घसरून ७८१.४६ अब्ज डॉलरवर आले आहे. मोठ्या मूल्याच्या व्यवहारांमध्ये झालेली घट हे या घसरणीमागील प्रमुख कारण असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तिसऱ्या तिमाहीत जगभरात जाहीर झालेल्या व्यवहारांची संख्याही १२.६ टक्क्यांनी कमी होऊन ९ हजार ७३२ वर आली. २०२४ पासून प्रथमच एका तिमाहीतील व्यवहारांची संख्या १० हजारांच्या खाली गेली आहे. दुसऱ्या तिमाहीत जागतिक व्यवहारांचे एकूण मूल्य १.२३९ ट्रिलियन डॉलर होते.
अमेरिकेतील व्यवहारमूल्यात ४४.६ टक्क्यांची घसरण
- जागतिक मंदीचा सर्वाधिक परिणाम अमेरिकेतील विलीनीकरण आणि अधिग्रहण व्यवहारांवर दिसून आला. अमेरिकेतील व्यवहारांचे एकूण मूल्य ४४.६ टक्क्यांनी घटून ३५८.४५ अब्ज डॉलरवर आले. व्यवहारांची संख्याही १० टक्क्यांनी कमी होऊन ३ हजार ६६२ झाली.
- दुसऱ्या तिमाहीत २० अब्ज डॉलरपेक्षा अधिक मूल्याचे सहा मोठे व्यवहार जाहीर झाले होते. मात्र, तिसऱ्या तिमाहीत अमेरिकेतील सर्वांत मोठा व्यवहार १७ अब्ज डॉलरचा होता. एऑन नॉर्थ अमेरिका इंक.ने यूएसआय अॅडव्हांटेज कॉर्प.च्या प्रस्तावित अधिग्रहणाची घोषणा केली होती.
- अमेरिकेतील सर्वांत मोठ्या १० व्यवहारांचे एकत्रित मूल्य ९०.७४ अब्ज डॉलर होते. मागील तिमाहीत हेच मूल्य ३५० अब्ज डॉलरपेक्षा अधिक होते. त्यामुळे मोठ्या व्यवहारांतील घट जागतिक बाजारातील एकूण घसरणीचे महत्त्वाचे कारण ठरली.
औद्योगिक क्षेत्राची कामगिरी तुलनेने चांगली
एकीकडे एकूण व्यवहारांमध्ये घट झाली असली, तरी अमेरिकेतील औद्योगिक क्षेत्राने तुलनेने चांगली कामगिरी केली. या क्षेत्रात ६८९ व्यवहार झाले असून त्यांचे एकूण मूल्य ६७.२७ अब्ज डॉलर होते. व्यवहारांची संख्या कमी झाली असतानाही या क्षेत्रातील व्यवहारमूल्यात मागील तिमाहीच्या तुलनेत ६० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली.
युरोप आणि आशिया-पॅसिफिकमध्येही घट
युरोपमध्ये तिसऱ्या तिमाहीत २ हजार ८१९ व्यवहार झाले. त्यांचे एकूण मूल्य २२५.५८ अब्ज डॉलर होते. मागील तिमाहीच्या तुलनेत व्यवहारमूल्यात ३१.२ टक्क्यांची घट झाली. आशिया-पॅसिफिक क्षेत्रात व्यवहारमूल्य ९.२ टक्क्यांनी घसरून १३१.०८ अब्ज डॉलरवर आले. या भागातील व्यवहारांची संख्या ७.८ टक्क्यांनी कमी होऊन २ हजार ३६४ झाली.
आगामी काळात व्यवहारांना गती मिळण्याची शक्यता
बाजारातील परिस्थिती सुधारल्यास आगामी काळात विलीनीकरण आणि अधिग्रहण व्यवहारांना पुन्हा गती मिळू शकते, असा अंदाज एस अँड पी ग्लोबलच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. आर्थिक परिस्थितीबाबत स्पष्टता वाढणे, वित्तपुरवठ्याच्या अटी स्थिर होणे आणि कंपन्यांच्या भविष्यातील उत्पन्नाबाबत विश्वास वाढणे यामुळे व्यवहारांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. संभाव्य व्यवहारांची चांगली तयारी आणि अनुकूल नियामक वातावरण यामुळे जागतिक एम अँड ए बाजारात पुन्हा तेजी येण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Read About : Foreign Investment – भारताच्या आर्थिक विकासामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा शेअर बाजाराकडे ओढा; पी. के. मिश्रा यांचे मत
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.