Air Pollution Crisis in India : ज्याप्रमाणे इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, तशीच पुनरावृत्ती काही ठराविक काळानंतर घटनांचीदेखील होत असते. त्यांचा क्रमदेखील ठरलेला असतो. म्हणजे, भारतात उत्सवकाळांच्या दरम्यानच्या घटनांची अगदी जशाच्या तशा क्रमाने पुनरावृत्ती होत असल्याने, अशा घटना घडणे फारसे धक्कादायकही वाटत नाही. गणेशोत्सव सुरू झाला की ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण वाढणार, दिवाळीचे दिवस सुरू झाले की ध्वनिप्रदूषणासोबत वायुप्रदूषणामुळे श्वासाची घुसमट सुरू होणार, थंडीचे दिवस सुरू झाले की धुक्याला लपेटून टाकणाऱ्या धुरक्याचा थर वाढणार हे सारे अव्याहतपणे सुरू आहे. आणि आता त्याची एवढी सवय झाली आहे की, एखाद्या हंगामात ते प्रदूषण झाले नाही, तर त्याचा आनंदोत्सवच साजरा केला जातो. तसा आनंदोत्सव आपण सुमारे साडेसहा वर्षांपूर्वी अनुभवला; पण तेव्हा तो साजरा करण्याच्या मानसिकतेत आपण नव्हतो. अन्यथा, त्या आनंदाचा अनुभव आपण सतत सोबत बाळगला असता.
आता सारे काही पूर्वपदावर आल्याने त्याचाही विसर पडला असून, नियमित घडणाऱ्या प्रदूषणाच्या सवयीची नैमित्तिक गुलामगिरी पुन्हा सुरू झाली आहे. साडेसहा वर्षांपूर्वी, एप्रिल २०२० मध्ये पंजाबातील जालंधरमधून एका सकाळी उगवतीच्या सूर्यकिरणांत चमकणाऱ्या हिमालयाचे दर्शन घडले. या बातमीने देशात आश्चर्य आणि आनंद उचंबळून आला. कोविड काळातील संचारबंदीमुळे थांबलेल्या वाहतुकीचे प्रदूषण संपताच हवेतील प्रदूषणाचा पडदा दूर झाल्याने कित्येक दशकांनंतर हा चमत्कार जालंधरवासीयांना अनुभवता आला. उभ्या देशाने त्याची दखल घेतली आणि प्रदूषणमुक्तीच्या केवळ घोषणा देऊन काही साधणार नाही याचाही धडा घेतला. पण काही सवयी अंगवळणी पडल्यानंतर त्यामध्ये गुरफटण्यातून नकळत झालेल्या सवयीचे आपण सारेजण बहुधा गुलाम झालो आहोत. तसे नसते, तर यंदाही पुन्हा एकदा दिवाळीच्या सणावर प्रदूषणाच्या संकटाची काजळी दाटली नसती.
राजधानी दिल्लीसह पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांतील हवेच्या प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याच्या बातम्या गेल्या तीनचार दिवसांत सर्वत्र झळकल्या आणि प्रदूषणकारी सवयींचे गुलाम झालेले आपण सारेजण त्या बातम्या वाचून स्वस्थ झालो. कारण, त्या बातम्या नव्या नाहीत. आपण त्या वर्षानुवर्षे वाचत, ऐकत आणि अनुभवत आलो आहोत.
हवामानात होणारे बदल हे संकट आहे, भविष्यात हे संकट अधिकाधिक गहिरे होत जाईल याची जाणीव आपल्याला झाली, त्यास आता काही दशके लोटली आहेत. या संकटापासून बचाव करण्यासाठी जीवनशैलीतील बदल हाच सर्वोत्तम मार्ग आहे हे वास्तव आपण स्वीकारले त्यालाही आता अनेक वर्षे झाली आहेत. हवामानबदलाच्या संकटापासून संरक्षण करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू झाल्याच्या बातम्यांनी तर दशकांचा कालावधी केव्हाच पार केला. या प्रयत्नांतील आशेचा किरण म्हणून भारताकडे पाहिले जात असल्याच्या बातमीने आता या चर्चेत पदार्पण केले आहे. बहुधा त्यालाही जवळपास दहा वर्षे झाली असावीत. त्यामुळे, एका बाजूला प्रदूषणविरोधी लढ्याचे रणशिंग फुंकून आकर्षक घोषणांचा गजर करत असताना, दुसरीकडे प्रदूषणाचे संकट झेलत राहावयाचे हीच जीवनशैली आता समाजाच्या अंगवळणी पडली आहे. राजस्थान आणि पंजाबमध्ये शेतातील कचरा जाळण्याच्या प्रकारांत वाढ झाल्यामुळे राजधानी दिल्लीस हवा प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. राजधानी दिल्लीच्या हवेचा दर्जा यंदाही दिवाळीच्या पहिल्याच दिवशी कमालीचा खालावला.
मुंबईनेदेखील प्रदूषणाच्या स्पर्धेत हिरिरीने उडी घेतली. अजिबातच अनपेक्षित नसलेल्या या बातम्या वरवर पाहता धक्कादायक वाटण्याचेही काहीच कारण नाही. तसेही, दिल्लीच्या हवेत सतत विचित्र आणि अनपेक्षित चढउतार होतच असतात. अशा अनपेक्षित चढ-उतारांची सर्वच महानगरांना आता सवय होऊ लागली असावी. मोकळा, शुद्ध हवेचा श्वासदेखील महाग व्हावा अशी परिस्थिती असलेल्या शहरांतील हवेची ही दुरवस्था असेल, तर देशाच्या अन्य भागांतील हवा हवीहवीशी वाटण्याएवढी चांगली राखणे कुठल्याच यंत्रणेला शक्य नसणार, हे ओघानेच येते. दिल्ली-मुंबईतील हवेचा दर्जा तसाही कायमच यथातथाच असतो. कधी त्या हवेत प्रदूषणाचे प्रमाण वाढते, तर कधी प्रदूषित वातावरणामुळे साथीचे आजार बळावतात. कधी कडाक्याच्या उन्हाळ्यातही हवेत सर्वत्र धुक्यासारखे धुराचे पडदे निर्माण होऊन दूरचेच नव्हे तर जवळचे, अगदी बाजूचेही दिसणे दुर्लभ होऊन जाते.
हवेतील अशा विकारी बदलांपासून बचाव करण्यासाठी किंवा त्याला सरावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असले, तरी प्रत्येक वर्षी प्रदूषणाची पातळी वाढतच असून यंदा तर प्रदूषणाने कमाल पातळी गाठल्याने मुंबई, दिल्लीची हवा हा एक चिंताजनक चर्चेचा विषय होऊन गेला आहे. खरे तर, दिवाळीचा उत्सव म्हणजे गुलाबी थंडीचा, दवभरल्या धुक्याची चादर लपेटून उगवणाऱ्या पहाटेचा आणि त्यातून वाट काढत धरतीवर अवतरणाऱ्या कोवळ्या सूर्यकिरणांनी प्रफुल्लित होण्याचा हंगाम; पण लहरी हवामानाने ही स्वप्ने केव्हाच पुसून टाकली आहेत आणि आता तर त्यामध्ये प्रदूषणाची भर पडली आहे. शहरांच्या हवेला आता दवभरल्या धुक्याऐवजी प्रदूषित धुराचा विळखा असतो.
अहोरात्र कानावर आदळणाऱ्या आवाजी गोष्टींमुळे मनामनांवर ध्वनिप्रदूषणाचे आघात सुरू असतात. अशा संकटकाळी दिवाळीच्या सणानिमित्त घडणाऱ्या प्रदूषणाची भर पडण्याची भीती ओळखून न्यायालयाने किंवा प्रशासनाने काही आदेश, निर्णय जारी केले, तरीही, बिघडलेल्या हवेच्या संकटापासून सहजासहजी सुटका नाही, हे स्पष्ट झाले आहे. तरीही प्रदूषणाचा दोष पूर्णत: माणसाचाच आहे. कारण प्रदूषण ही नैसर्गिक आपत्ती नाही. निसर्ग कधीच अशा जीवघेण्या आपत्तींना सतत सोबत बाळगत नसतो.
Read About : Bank Liability in Digital Arrest Scams : उपकार नव्हे, जबाबदारी!
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.