Ad Advertisement Ad Advertisement

Earthshot Prize 2026 – मुंबईत प्रथमच रंगणार ‘अर्थशॉट प्राइज’; यंदाची आवृत्ती सर्वात मोठी ठरणार

प्रिन्स विल्यम यांच्या उपस्थितीत १७ नोव्हेंबरला पुरस्कार सोहळा

मुंबई : Earthshot Prize 2026 – पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर प्रभावी उपाय शोधणाऱ्या जगातील प्रतिष्ठित ‘अर्थशॉट प्राइज’ पुरस्कार सोहळ्याचे यंदा प्रथमच भारतात आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईत १५ ते १७ नोव्हेंबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार असून, १७ नोव्हेंबरला मुख्य पुरस्कार सोहळा पार पडेल. यंदाची आवृत्ती या पुरस्काराच्या इतिहासातील सर्वात मोठी ठरणार असल्याची घोषणा अर्थशॉट प्राइजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेसन नॉफ यांनी केली आहे. गुरुवारी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारतात पर्यावरणविषयक नवकल्पना आणि उपाययोजनांचे महत्त्व वाढत असल्याचे सांगताना त्यांनी या उपक्रमासाठी भारताची निवड विशेष असल्याचे नमूद केले.

भारतातून सर्वाधिक अंतिम स्पर्धक आणि विजेते
  • अर्थशॉट प्राइजच्या सुरुवातीपासूनच भारताने या उपक्रमात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतातून सर्वाधिक अंतिम फेरीतील स्पर्धक आणि विजेते निवडले गेले आहेत. त्यामुळे हा पुरस्कार सोहळा भारतात आयोजित होणे म्हणजे हा उपक्रम जणू मायदेशी परतल्यासारखा असल्याची भावना नॉफ यांनी व्यक्त केली.
  • प्रिन्स विल्यम हे या पुरस्काराचे संस्थापक आणि अध्यक्ष असून, ते यंदाच्या सोहळ्याचे नेतृत्व करणार आहेत. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, गायिका श्रेया घोषाल आणि ऑस्कर पुरस्कार विजेते अभिनेते रामी मलेक यांच्यासह अनेक नामवंत व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
  • प्रिन्स विल्यम यांनी दहा वर्षांपूर्वी भारताला भेट दिली होती. त्यावेळी पर्यावरण क्षेत्रात सुरू असलेले काम पाहूनच त्यांना अशा उपक्रमासाठी व्यासपीठ उभारण्याची प्रेरणा मिळाल्याचे नॉफ यांनी सांगितले. जेम्स बाँड चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखले जाणारे रामी मलेक हेही पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दोन भारतीय उपक्रम अंतिम फेरीत

यंदाच्या पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या १५ अंतिम स्पर्धकांमध्ये भारतातील दोन उपक्रमांचा समावेश आहे.

  • महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी : तीनचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर विद्युतीकरण करण्याच्या उपक्रमासाठी ‘क्लीन अवर एअर’ या विभागात निवड.
  • महिला हाउसिंग ट्रस्ट : महिलांना उष्णतेच्या लाटांचा सामना करण्यासाठी मदत करणाऱ्या कार्यासाठी ‘फिक्स अवर क्लायमेट’ या विभागात निवड.

हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास आणि वायुप्रदूषण यांसारख्या समस्यांचा भारताला मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे. मात्र, या आव्हानांवर उपाय शोधण्याचे कामही भारतात होत असल्याचे नॉफ यांनी अधोरेखित केले. भारतीय उपक्रमांचे काम जागतिक स्तरावर महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाच विभागांतील विजेत्यांना मिळणार १० लाख पौंड

अर्थशॉट प्राइजमध्ये पाच विभागांचा समावेश आहे. यामध्ये निसर्गाचे संरक्षण व पुनर्संचयित करणे, स्वच्छ हवा, महासागरांचे पुनरुज्जीवन, कचरामुक्त जग आणि हवामान बदलावर उपाय या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विभागातील विजेत्याला १० लाख पौंडांचा पुरस्कार दिला जाणार आहे. या निधीच्या माध्यमातून संबंधित पर्यावरणपूरक उपाययोजनांचा विस्तार आणि त्यांचा प्रभाव वाढवण्यास मदत होणार आहे.

२४० देशांमध्ये होणार प्रसारण

अंतिम फेरीतील स्पर्धकांना मुंबईतील पुरस्कार सोहळ्यापूर्वी जयपूर येथेही नेण्यात येणार आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबरला ते मुंबईत परततील. प्रिन्स विल्यम यांच्या नेतृत्वाखालील जागतिक पुरस्कार परिषद विजेत्यांची निवड करणार आहे. या सोहळ्याचे प्राइम या माध्यमातून २४० देशांमध्ये प्रसारण होणार असल्याचे नॉफ यांनी सांगितले. पर्यावरणविषयक प्रभावी आणि विस्तारक्षम उपायांना जागतिक व्यासपीठ मिळवून देणे, हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे.

Read About : Amitabh Bachchan Personality Rights – अमिताभच्या व्यक्तिमत्त्व हक्कांना न्यायालयाचे संरक्षण
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.