शेतकरी, अनाथ मुले अन् मुक्या जनावरांनाही मदतीचा हात!
छत्रपती संभाजीनगर : MGM Alumni Social Initiative – दिवाळीचा आनंद प्रत्येकाच्या आयुष्यात फुलावा, या भावनेतून महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने सामाजिक बांधिलकी जपत ‘आशीर्वादाची दिवाळी’ हा अनोखा उपक्रम राबविला. या उपक्रमातून तब्बल १ लाख ५७ हजार ८१३ रुपयांचा निधी संकलित करून दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबे, अनाथ मुले, वृद्धाश्रम आणि मुक्या जनावरांना मदतीचा हात देण्यात आला.
यंदा पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने बीड जिल्ह्यातील अनेक शेतकरी कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आसरडोह (ता. धारूर, जि. बीड) येथील सामाजिक कार्यकर्ते रविकिरण देशमुख यांनी गरजू कुटुंबांसाठी मदतीचे आवाहन केले. एमजीएम विद्यापीठाचे रासेयो समन्वयक डॉ. रवींद्र देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी, मित्रपरिवाराने आणि परदेशात स्थायिक असलेल्या मित्रांनीही आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, अवघ्या आठ ते दहा तासांत दीड लाखांहून अधिक निधी जमा झाला.
संकलित निधीतून आसरडोह येथील ५० गरजू शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपये किमतीचे किराणा साहित्य देण्यात आले. यामध्ये दिवाळीचे गोड पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तसेच पुढील सुमारे २० दिवस पुरेल अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. यासाठी एक लाख रुपये खर्च करण्यात आले. दुष्काळाचा फटका केवळ माणसांनाच नव्हे, तर मुक्या जनावरांनाही बसत असल्याने अंबाजोगाई येथील पावनी गोशाळेला ३० हजार रुपयांची मदत देण्यात आली. या रकमेतून जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील भगवानबाबा बालिकाश्रमातील अनाथ मुला-मुलींसाठी २५ हजार ८१३ रुपयांचे किराणा साहित्य उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय मलेशियात स्थायिक असलेले माजी विद्यार्थी गिरीश कुलकर्णी यांनी स्वत:हून तेल, तांदूळ आणि पीठ यांसारख्या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. हे साहित्य मातोश्री वृद्धाश्रमात वितरित करण्यात येणार आहे.
Read About : Diwali Celebration Away from Home – घरापासून दूर, पण मायेच्या घासाने दिवाळी गोड!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.