नागसेनवनच्या ऐतिहासिक वास्तूंना नवी झळाळी, सहा संस्थांच्या दुरुस्तीसाठी ६३.९६ कोटी मंजूर
छत्रपती संभाजीनगर: Historic Educational Institutions Fund – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘द पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमधील ऐतिहासिक शैक्षणिक संस्थांच्या जतन, संवर्धन आणि नूतनीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने १२ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी करत शहरातील सहा शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहांच्या दुरुस्ती व विविध सुविधांसाठी एकूण ६३ कोटी ९६ लाख ४४ हजार २४५ रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक चळवळीचा ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. नागसेनवन परिसरासह शहरातील महत्त्वाच्या शैक्षणिक वास्तूंना नवसंजीवनी मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. यात मिलिंद विज्ञान महाविद्यालय, नागसेनवन- ११ कोटी ७७ लाख ४८ हजार ३२७ रुपये, अजिंठा बॉईज हॉस्टेल – ११ कोटी २९ लाख ६९ हजार ६१६ रुपये, मिलिंद कला महाविद्यालय, नागसेनवन – ११ कोटी २२ लाख ४२ हजार ९९६ रुपये, प्रज्ञा मुलींचे वसतिगृह – ९ कोटी ५१ लाख २७ हजार ७५५ रुपये, मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल – ९ कोटी ६६ लाख ८० हजार ६२६ रुपये, मिलिंद प्रि-प्रायमरी अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल – ६ कोटी ४८ लाख ३४ हजार ९२५ रुपये मंजूर करण्यात आले आहे.
इमारतींचा कायापालट, विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा
या निधीतून संस्थांच्या गरजेनुसार इमारतींची दुरुस्ती, फरशी, भिंतींचे प्लास्टर, रंगरंगोटी, विद्युतीकरण, दरवाजे, खिडक्या, पत्रे, पंखे, शालेय फर्निचर, ग्रंथालयासाठी आवश्यक फर्निचर तसेच विद्यार्थ्यांसाठी बेडिंग साहित्य उपलब्ध करून देण्याची कामे करण्यात येणार आहेत. वसतिगृहांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य इमारतींना संरक्षक गेट बसविण्याचाही समावेश आहे.
ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानले. त्यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या या संस्था अनेक पिढ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत आल्या आहेत. त्यामुळे या वास्तूंची दुरुस्ती म्हणजे केवळ इमारतींचे नूतनीकरण नसून बाबासाहेबांनी उभारलेल्या शैक्षणिक वारशाचे जतन करण्याचा प्रयत्न आहे. शासन निर्णयानुसार संबंधित कामे मूळ वास्तुविशारदांनी मंजूर केलेल्या नकाशानुसार आणि निर्धारित मापदंडांनुसार करावी लागणार आहेत. तसेच ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करून अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर झाल्यानंतरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात करता येणार आहे.
Read About : GMCH Medical Students – वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी घाटीत संधींची नवी कवाडे उघडणार !
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.