मुंबई इंडियन्सकडून पंजाब किंग्जमध्ये १८ कोटींना हार्दिकची बदली; अर्शदीप सिंग मुंबईच्या संघात दाखल
नवी दिल्ली : Hardik Pandya Trade भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्सचा संघ सोडण्याचा निर्णय घेणे ही मोठी चूक होती, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने व्यक्त केले आहे. मुंबई इंडियन्समधील दुसऱ्या पर्वात अपेक्षित कामगिरी करता न आलेल्या हार्दिकने आता पंजाब किंग्जकडून खेळताना फलंदाजी, गोलंदाजी आणि अखेरच्या षटकांतील फटकेबाजीवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही कैफने दिला आहे. आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील बहुचर्चित खेळाडू अदलाबदल पूर्ण झाली आहे. या व्यवहारात मुंबईने हार्दिक पंड्याला पंजाबकडे पाठवले, तर पंजाबचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मुंबईच्या संघात दाखल झाला आहे. हार्दिकसाठी पंजाबने १८ कोटी रुपये मोजले आहेत. त्याचे यापूर्वीचे मानधन १६.३५ कोटी रुपये होते. अर्शदीप मात्र त्याच्या सध्याच्या १८ कोटी रुपयांच्या मानधनावर मुंबईकडे गेला आहे.
गुजरातमध्ये हार्दिकचा दबदबा; मुंबईत कामगिरी घसरली
- हार्दिकने मुंबई इंडियन्सकडून सात हंगाम खेळल्यानंतर २०२२ मध्ये गुजरात टायटन्समध्ये प्रवेश केला होता. कर्णधार म्हणून पहिल्याच हंगामात त्याने गुजरातला विजेतेपद मिळवून दिले. २०२३ मध्येही गुजरातने अंतिम फेरी गाठली होती. मात्र, २०२४ मध्ये हार्दिक पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परतला आणि संघाचे कर्णधारपदही त्याच्याकडे सोपवण्यात आले.
- मुंबईतील दुसऱ्या पर्वात हार्दिकला अपेक्षित यश मिळाले नाही. तीन हंगामांत त्याने ३९ सामन्यांमध्ये ६४७ धावा केल्या. त्याची फलंदाजीची सरासरी २१.५३ आणि स्ट्राइक रेट १४७.८२ राहिला. गोलंदाज म्हणून त्याने २९ बळी घेतले.
- आयपीएलमधील एकूण १६२ सामन्यांत हार्दिकच्या नावावर २ हजार ९५५ धावा आणि ८२ बळी आहेत. त्याचा एकूण स्ट्राइक रेट १४६.२८ आहे.
‘गुजरात सोडणे ही भावनिक चूक’
मोहम्मद कैफने आपल्या यूट्यूब वाहिनीवर बोलताना हार्दिकच्या मुंबईत परतण्याच्या निर्णयावर टीका केली. मुंबई इंडियन्सशी असलेले भावनिक नाते आणि जुन्या संघात परतण्याची इच्छा यामुळे त्याने हा निर्णय घेतला असावा, असे कैफने म्हटले. कैफ म्हणाला, “गुजरात टायटन्स सोडणे ही हार्दिकची मोठी चूक होती. हा निर्णय कदाचित भावनिक होता. मुंबईशी त्याचे जुने नाते होते. मात्र, गुजरातमध्ये तो यशस्वी कर्णधार होता आणि त्याला राजासारखा मान होता. हा निर्णय त्याच्या कामगिरीवर आणि नेतृत्वावर परिणाम करणारा ठरला. मुंबईतील दुसरे पर्व विसरून त्याने आता पुढे जाणे गरजेचे आहे.”
कर्णधारपदाचा दबाव नको; खेळावर लक्ष केंद्रित करावे
गुजरातकडून खेळताना हार्दिकने ३१ सामन्यांत नेतृत्व केले. या काळात त्याने ३० डावांत ८३३ धावा केल्या. त्याची सरासरी ३७.८६ होती. याशिवाय त्याने ११ बळीही घेतले. गुजरातच्या पहिल्याच हंगामात त्याने ४८७ धावा करत संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. हार्दिकसारख्या अष्टपैलू खेळाडूसाठी कर्णधारपदाची जबाबदारी अतिरिक्त दबाव निर्माण करू शकते, असे कैफचे मत आहे. पंजाबकडून खेळताना त्याने कर्णधारपदाच्या दबावातून मुक्त होऊन फलंदाज, गोलंदाज आणि अखेरच्या षटकांतील सामनावीर म्हणून स्वतःला पुन्हा सिद्ध करावे, असे कैफने सुचवले.
अर्शदीपच्या अनुभवाचा मुंबईला फायदा
दरम्यान, अर्शदीप सिंग आठ हंगाम पंजाब किंग्जकडून खेळल्यानंतर मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे. २०१९ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने पंजाबच्या गोलंदाजीची महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. ९६ सामन्यांत १११ बळी घेत तो पंजाबचा सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज ठरला आहे. २०२५ च्या हंगामात त्याने २१, तर २०२६ मध्ये १४ बळी घेतले. नव्या चेंडूने सुरुवातीला बळी मिळवणे आणि अखेरच्या षटकांत अचूक गोलंदाजी करणे ही त्याची जमेची बाजू आहे. त्यामुळे अर्शदीपच्या समावेशामुळे मुंबईच्या वेगवान गोलंदाजीला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
Read About : India vs New Zealand – न्यूझीलंडकडून भारताचा 0-5 गोलने धुव्वा; गोलरक्षक विशाल कैथची झुंज अपुरी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.