बीड पोलीस अधीक्षकांकडून कारवाई
बीड: Beed, Dharashiv जिल्ह्यामध्ये घरफोड्या व जबरी चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १११ अन्वये ‘मिनी मकोका’ (संघटित गुन्हेगारी) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या अंतर्गत चार आरोपींवर कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
बीड तालुक्यातील नेकनूर ठाणे हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी ६ जुलै २०२६ रोजी एक कारवाई केली. फिर्यादी रमेश बाबासाहेब काळे (रा. येळंबघाट, ता.बीड) यांच्या घरी ५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी घरात शिरुन सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून एकूण ६ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनिरीक्षक पद्माकर आहेर आणि सपोनि मंगेश साळवे यांनी या गुन्ह्याचा प्राथमिक तपास केला.
चार संशयित जेरबंद
तपासादरम्यान मिळालेल्या माहिती आणि तांत्रिक विश्लेषकाच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यातील चार संशयित आरोपींना जेरबंद केले. प्रकाश उर्फ गुड्या शाहाजी काळे (वय २२), शहाजी शेषेराव पवार (वय २५), संतोष बारीकराव शिंदे (वय २२, सर्व रा. पारधी वस्ती, मोहा, ता. कळंब, जि. धाराशिव) आणि दिनेश नागनाथ काळे (वय २४, रा. कुरणे नगर, धाराशिव) अशी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींची नावे आहेत. त्यांना पोलीस कोठडीत असताना कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून ३२ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून, या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी अद्याप फरार आहेत आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अटक करण्यात आलेल्या या टोळीचा मुख्य सूत्रधार आणि त्याच्या साथीदारांनी बीड व शेजारील धाराशिव जिल्ह्यात मिळून आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. हे सर्व गुन्हे शस्त्रांचा धाक दाखवून व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे केल्याचे समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी या गुन्ह्यात ‘मिनी मकोका’ लावण्याची विशेष परवानगी नेकनूरचे सपोनि मंगेश साळवे यांना दिली. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली.
