Ad Advertisement Ad Advertisement

Suniel Shetty Nanhe Dil Movie – सुनील शेट्टीचा ‘नन्हे दिल’ 20 नोव्हेंबरला चित्रपटगृहात

शाळेच्या प्रवेशातून समानतेचा संदेश, ट्रेलर प्रदर्शित, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही चित्रपटाची दखल

मुंबई : Suniel Shetty Nanhe Dil Movie – अभिनेता सुनील शेट्टी पुन्हा एकदा वेगळ्या विषयाच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या ‘नन्हे दिल’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, हा चित्रपट २० नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत दाखल होणार आहे. बालपण, शिक्षणातील समान संधी आणि प्रत्येक मुलाला स्वत:ची स्वप्ने पूर्ण करण्याचा अधिकार या महत्त्वाच्या विषयांवर चित्रपटाची कथा आधारित आहे.

धोब्याच्या मुलाला मिळणार मोठ्या शाळेत संधी

‘नन्हे दिल’मध्ये सुनील शेट्टी एका प्रतिष्ठित शाळेच्या मुख्याध्यापकाची भूमिका साकारत आहे. रघू नावाचा एक हुशार मुलगा त्याच्या नजरेस पडतो. रघूचे वडील कपडे धुण्याचे काम करतात. त्यामुळे त्याची कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थिती साधी असते. मात्र, त्याच्यातील गुणवत्ता ओळखून मुख्याध्यापक त्याला श्रीमंत कुटुंबातील मुलांसोबत शिकण्याची संधी देतात.

मुलाची बुद्धिमत्ता आणि स्वप्ने त्याच्या घरची परिस्थिती किंवा सामाजिक स्तर पाहून ठरवू नयेत, हा विचार चित्रपटातून मांडण्यात आला आहे. प्रत्येक मुलाला समान संधी मिळाली, तर तोही मोठी स्वप्ने पाहू शकतो आणि ती पूर्ण करू शकतो, असा संदेश या कथेतून दिला आहे.

‘आजच्या पालकांसाठीही महत्त्वाचा संदेश’

चित्रपटाबद्दल बोलताना सुनील शेट्टीने सांगितले की, ‘नन्हे दिल’ हा मुलांना समान संधी देण्याच्या विचारावर आधारित आहे. प्रत्येक मुलाला आपले स्वप्न जगण्याची मोकळीक मिळाली पाहिजे. मुलांनी आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यापेक्षा स्वत:ची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्याने म्हटले. आजच्या पालकांनी मुलांच्या इच्छा आणि क्षमतांचा आदर करणे महत्त्वाचे असल्याचे त्याने स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही चित्रपटाची दखल

स्वरूप राज मेदारा यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण ३७ दिवसांत पूर्ण झाले. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी या चित्रपटाचे नाव ‘फ्लाय हाय लिटल हार्ट्स’ असे ठेवण्यात आले आहे. टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही चित्रपटाचे प्रदर्शन झाले आहे.

श्रीनाथजीज हॉस्पिटॅलिटी आणि नाइनफोल्ड पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती नवरस एंटरटेनमेंटने केली आहे. सौमय जैन, श्रिया टोर्णे, ध्रुव करुणाकर आणि ऐश्वर्या यादव यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, सायविन क्वाड्रस यांनी पटकथा लेखन आणि क्रिएटिव्ह प्रोड्यूसरची जबाबदारी सांभाळली आहे. एकूणच, केवळ मनोरंजन न करता मुलांचे शिक्षण, समानता आणि स्वप्नांना मिळणारी संधी यावर विचार करायला लावणारा ‘नन्हे दिल’ २० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read About: Ventilator 2 Marathi Movie – दहा वर्षांनंतर पुन्हा येणार ‘व्हेंटिलेटर’
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.