जागतिक मधुमेह दिन विशेष, मधुमेहींनो, डोळ्यांकडे दुर्लक्ष नको!
लहान मुलांपासून तरुणांपर्यंत मधुमेहाचा वाढता धोका
छत्रपती संभाजीनगर: Diabetes Eye Disease Diabetic – मधुमेह म्हटले की रक्तातील वाढलेली साखर, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार आणि औषधोपचार एवढ्याच गोष्टी डोळ्यांसमोर येतात. मात्र या आजाराचा एक अत्यंत गंभीर आणि दुर्लक्षित परिणाम म्हणजे दृष्टीवर होणारा आघात! विशेष म्हणजे, डोळ्यांची नजर व्यवस्थित आहे, स्पष्ट दिसते आहे म्हणून सर्व काही ठीक आहे, असे समजणे धोकादायक ठरू शकते. कारण मधुमेहामुळे डोळ्यांच्या पडद्यावरील सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे नुकसान सुरू झालेले असतानाही सुरुवातीला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. वेळेत निदान आणि उपचार न झाल्यास दृष्टी कायमची जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे मधुमेहात केवळ रक्तातील साखरच नव्हे, तर डोळ्यांची दृष्टीही जपणे तितकेच महत्त्वाचे आहे.
बदलती जीवनशैली, जंकफूडचे वाढते प्रमाण, व्यायामाचा अभाव आणि आहारातील असंतुलन यामुळे मधुमेहाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. पूर्वी प्रामुख्याने मोठ्या वयातील व्यक्तींमध्ये आढळणारा हा आजार आता तरुणांनाही आपल्या विळख्यात घेत आहे. तिशीच्या आतील तरुणांमध्येही मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलच्या समस्या वाढत असल्याचे चित्र आहे. या सर्वांचा परिणाम शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर होत असला, तरी मधुमेहाचा सर्वाधिक गंभीर परिणाम डोळ्यांच्या रेटिनावर म्हणजेच नेत्रपटलावर होऊ शकतो.
रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळ नियंत्रणाबाहेर राहिल्यास डोळ्यांच्या पडद्यावरील अतिशय बारीक रक्तवाहिन्यांच्या आतील पेशींचे नुकसान होते. त्यामुळे या रक्तवाहिन्यांमधून रक्त आणि द्रवपदार्थ बाहेर झिरपू लागतात. परिणामी डायबेटिक रेटिनोपॅथी हा नेत्रविकार उद्भवतो. सुरुवातीला या आजाराची कोणतीही ठळक लक्षणे दिसत नाहीत. मात्र हळूहळू पडद्याचे नुकसान वाढत जाते. आजार प्रगत अवस्थेत पोहोचल्यास डोळ्यांत रक्तस्राव होणे, नवीन असामान्य रक्तवाहिन्या तयार होणे आणि नेत्रपटल सरकण्यासारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
लक्षणांची वाट पाहू नका; नियमित तपासणी हाच बचाव
दृष्टी धूसर होणे, अस्पष्ट दिसणे, वस्तूंच्या प्रतिमा वाकड्या दिसणे, रंग ओळखण्यात अडचण येणे, डोळ्यांसमोर काळे ठिपके तरंगणे, दूरचे पाहताना त्रास होणे किंवा हळूहळू नजर कमी होणे ही लक्षणे आढळल्यास तातडीने नेत्रतज्ज्ञ किंवा रेटिना विशेषतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मात्र ही लक्षणे दिसेपर्यंत थांबणे योग्य नाही. टाइप २ मधुमेहाचे निदान होताच डोळ्यांच्या पडद्याची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी करावी. रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे, औषधे किंवा इन्सुलिन नियमित घेणे, संतुलित आहार घेणे आणि दररोज पुरेसा व्यायाम करणे यामुळे डोळ्यांच्या गुंतागुंतीचा धोका कमी करण्यास मदत होते.
डॉ. अर्चना वरे (नेत्ररोग विभागप्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय)
प्रत्येक सहाव्या मधुमेही व्यक्तीला रेटिनोपॅथीचा धोका!
भारतात २०१५ ते २०१९ या कालावधीत झालेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणातील आकडेवारी चिंताजनक आहे. तपासणी झालेल्या ५० वर्षे व त्यावरील मधुमेही व्यक्तींपैकी १६.९ टक्के म्हणजेच जवळपास प्रत्येक सहाव्या व्यक्तीला डायबेटिक रेटिनोपॅथी आढळली. सुमारे ३.६ टक्के व्यक्तींमध्ये दृष्टीला धोका निर्माण करणारा आजार, तर सात टक्के व्यक्तींमध्ये मॅक्युलोपॅथी आढळली. याहून धक्कादायक बाब म्हणजे, मधुमेह असल्याचे आधीपासून माहीत असलेल्या जवळपास ९० टक्के व्यक्तींनी यापूर्वी कधीही डोळ्यांच्या पडद्याची तपासणी करून घेतली नव्हती. म्हणजेच मधुमेहाचे निदान झाले असले, औषधोपचार सुरू असले, तरी डोळ्यांच्या आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे.
मुलांच्या डोळ्यांकडेही दुर्लक्ष नको!
मधुमेह म्हणजे केवळ मोठ्या माणसांचा आजार, हा समज आता बदलण्याची गरज आहे. लहान मुलांमध्ये आढळणारा टाइप १ मधुमेह आणि प्रौढांमध्ये अधिक प्रमाणात दिसणारा टाइप २ मधुमेह या दोन्ही प्रकारांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेह असलेल्या मुलांमध्येही रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळ वाढलेले राहिल्यास डोळ्यांच्या पडद्यावरील सूक्ष्म रक्तवाहिन्यांना इजा होऊ शकते. विशेषत: मधुमेहाचा कालावधी वाढल्यास आणि पौगंडावस्थेत प्रवेश केल्यानंतर रेटिनोपॅथीचा धोका वाढू शकतो.
काही किशोरवयीन मुलांमध्ये या आजाराची प्रगती वेगाने होण्याची शक्यताही असते. टाइप १ मधुमेह असलेल्या मुलांमध्ये मधुमेह होऊन तीन ते पाच वर्षे झाल्यानंतर आणि वयाची ११ वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा पौगंडावस्था सुरू झाल्यावर, यापैकी जो टप्पा आधी येईल तेव्हा पहिली पडदा तपासणी करावी. तर टाइप २ मधुमेहाचे निदान झालेल्या मुलांची पडदा तपासणी निदान होताच किंवा त्यानंतर लवकरात लवकर करणे आवश्यक आहे.
Read About : Ghati Hospital Bronchoscopy Almond Removed Child – दिवाळी पहाट ठरली चिमुकल्यासाठी जीवनदानाची!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.