नव्या संशोधनात ३०० हून अधिक गर्भवती महिलांच्या पोषणाचा अभ्यास; सहा महिन्यांच्या बाळांमध्ये चिडचिड आणि नकारात्मक भावनांशी संबंध आढळल्याचा संशोधकांचा दावा
नवी दिल्ली : Vitamin C During Pregnancy गर्भावस्थेत आईने पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन ‘सी’ न घेतल्यास बाळाच्या भावनिक विकासावर परिणाम होऊ शकतो, असा निष्कर्ष नव्या संशोधनातून समोर आला आहे. अशा मातांच्या सहा महिन्यांच्या बाळांमध्ये चिडचिड, अस्वस्थता आणि नकारात्मक भावना अधिक दिसण्याची शक्यता संशोधकांनी नोंदवली आहे. हे संकेत भविष्यातील मानसिक आरोग्याच्या जोखमीशी संबंधित असू शकतात.
‘डेव्हलपमेंट सायकॉलॉजी’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या अभ्यासात ३०० हून अधिक गर्भवती महिलांच्या पोषण आणि मानसिक आरोग्यविषयक माहितीचे विश्लेषण करण्यात आले. आहार आणि पूरक गोळ्यांमधून मिळणाऱ्या व्हिटॅमिन ‘सी’ चे प्रमाण तपासण्यात आले. तसेच महिलांमधील नैराश्य, चिंता आणि तणावाचे प्रमाणही मोजण्यात आले. त्यांच्या बाळांचे सहा महिन्यांनंतर वर्तन आणि स्वभावाचे मूल्यमापन करण्यात आले.
गर्भावस्थेतील ताणाचाही परिणाम
गर्भावस्थेतील मानसिक तणावामुळे आईच्या आहारावर परिणाम होऊन आवश्यक पोषक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते. याचा गर्भातील मेंदूच्या विकासावर तसेच बाळाच्या भावना समजून घेण्याच्या आणि नियंत्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पूरक गोळ्यांमुळे संरक्षणाची शक्यता
ओरेगॉन आरोग्य आणि विज्ञान विद्यापीठातील संशोधकांच्या मते, व्हिटॅमिन ‘सी’ च्या पूरक गोळ्यांनी आईच्या तणावाचा बाळाच्या नकारात्मक भावनांशी असलेला संबंध काही प्रमाणात कमी केल्याचे दिसले. मात्र, केवळ आहारातून मिळणाऱ्या व्हिटॅमिन ‘सी’ बाबत असा परिणाम आढळला नाही.
प्रमुख संशोधक एलिझाबेथ वूड आणि एलिनॉर सुलिव्हन यांनी गर्भावस्थेतील पोषण सुधारण्याचे महत्त्व अधोरेखित केले. व्हिटॅमिन ‘सी’ पूरक गोळ्या स्वस्त आणि सहज उपलब्ध असल्या, तरी गर्भवती महिलांनी त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात. हा अभ्यास संबंध दर्शवतो; त्यामुळे प्रत्येक बाळावर असा परिणाम होईलच, असे नाही.
Read About : Natural Weight Loss Peptide : एआयच्या मदतीने शोधला वजन कमी करणारा नवा पेप्टाइड; ओझेम्पिकला पर्याय ठरणार?
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.