स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी एआय अल्गोरिदमच्या मदतीने शोधला बीआरपी रेणू; प्राण्यांवरील प्रयोगांत अन्नसेवन आणि शरीरातील चरबी कमी झाल्याचे निष्कर्ष
नवी दिल्ली : Natural Weight Loss Peptide वजन कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ओझेम्पिक या औषधाला पर्याय ठरू शकेल अशा नैसर्गिक पेप्टाइडचा (अमिनो आम्लाची साखळी) शोध अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी लावला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने शोधलेल्या या बीआरपी रेणूमुळे भूक कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे, सध्याच्या औषधांमुळे होणारे पचनसंस्थेचे दुष्परिणाम टळण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. हे संशोधन ‘नेचर’ नियतकालिकात ५ मार्च रोजी प्रसिद्ध झाले.
संशोधकांनी ‘पेप्टाइड प्रेडिक्टर’ नावाचा एआय अल्गोरिदम विकसित केला. त्याने मानवी शरीरातील सुमारे २० हजार प्रथिननिर्मिती करणाऱ्या जनुकांचे विश्लेषण केले. त्यातून २,६८३ संभाव्य पेप्टाइड्सची यादी तयार झाली. त्यापैकी १०० रेणूंची चाचणी केल्यानंतर केवळ १२ अमिनो आम्लांनी बनलेला बीआरपी हा रेणू प्रभावी ठरला. त्याने सुरुवातीच्या चाचणीत मेंदूतील चेतापेशींची सक्रियता नियंत्रण गटाच्या तुलनेत दहापट वाढवली.
उंदीर, मिनीपिगमध्ये सकारात्मक परिणाम
उंदीर आणि मिनीपिगवर (कमी वजनाचे वराह) केलेल्या प्रयोगांत बीआरपीचे इंजेक्शन दिल्यानंतर पुढील एका तासातील अन्नसेवन ५० टक्क्यांपर्यंत कमी झाले. लठ्ठ उंदरांवर १४ दिवस केलेल्या प्रयोगात त्यांचे सरासरी तीन ग्रॅम वजन घटले. ही घट प्रामुख्याने शरीरातील चरबी कमी झाल्यामुळे झाली. याशिवाय ग्लुकोज आणि इन्सुलिन सहनशीलतेतही सुधारणा दिसली.
दुष्परिणाम कमी होण्याची शक्यता
ओझेम्पिकप्रमाणे बीआरपी पचनसंस्थेतील अनेक अवयवांवर परिणाम करत नाही, तर भूक नियंत्रित करणाऱ्या मेंदूतील हायपोथॅलॅमसवर अधिक लक्ष केंद्रित करते. प्राण्यांमध्ये बद्धकोष्ठता, मळमळ किंवा स्नायूंचे लक्षणीय नुकसान आढळले नाही.
मानवी चाचण्यांची प्रतीक्षा
बीआरपी कोणत्या रिसेप्टरशी जोडले जाते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शरीरात हा रेणू लवकर विघटित होण्याची समस्याही सोडवावी लागणार आहे. संशोधक आता प्राण्यांपुढील संशोधन आणि मानवी चाचण्यांच्या तयारीत आहेत. त्यामुळे हे औषध सुरक्षित व प्रभावी ठरते का, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.
Read About : Experimental Diabetes Implant – रक्तातील अतिरिक्त साखर शोषून घेणाऱ्या प्रायोगिक इम्प्लांटचा शोध ; टाइप – 2 मधुमेहाच्या उपचारांसाठी नवी आशा
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.