Ad Advertisement Ad Advertisement

Amitabh Bachchan’s Ancestral Village 2026 – महानायक अमिताभ बच्चन यांच्या गावाच्या विकासासाठी लातूरच्या तरुणाचा पुढाकार

युपीमधील बाबूपट्टी होणार ‘पुस्तकांचे गाव’; निवृत्ती यादव यांच्या संकल्पनेतून विकासाला नवी दिशा

लातूर Amitabh Bachchan’s Ancestral Village : महान साहित्यिक डॉ. हरिवंशराय बच्चन यांची जन्मभूमी आणि महानायक अमिताभ बच्चन यांचे मूळ गाव असलेल्या उत्तर प्रदेशातील बाबूपट्टीला साहित्य आणि संस्कृतीच्या माध्यमातून नवी ओळख मिळवून देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे जन्मलेले आणि डॉ. हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती यादव यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या संकल्पनेतून या गावाला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या विकासप्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणून गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे भूमिपूजन नुकतेच उत्साहात पार पडले.

ग्रामस्थांच्या उपस्थितीत पारंपरिक विधींनुसार झालेल्या या सोहळ्यात गावातील चिमुकली आर्या यादव आणि ज्येष्ठ नागरिक श्यामलाल पटेल यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या उपक्रमातून नव्या पिढीचा सहभाग आणि ज्येष्ठांचा सन्मान असा सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला. यावेळी सरपंच विकास यादव यांच्यासह महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्तर प्रदेश सरकारच्या मातृभूमी योजनेच्या माध्यमातून बाबूपट्टीच्या विकासासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत.

गावात सीसीटीव्ही कॅमेरे, सार्वजनिक प्रकाश व्यवस्था, बसण्यासाठी बाक, कचराकुंड्या आणि वृक्षसंवर्धनासाठी ट्री गार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच ‘लिव्हिंग लायब्ररी’ अर्थात जिवंत ग्रंथालय ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत असून, गावातील दहा कुटुंबांची यासाठी निवड करण्यात आली आहे.

त्यांच्या घरांना पुस्तक, साहित्य आणि वाचनसंस्कृतीशी जोडून ज्ञानाचा प्रसार करण्याचे नियोजन आहे. डॉ. हरिवंशराय बच्चन यांच्या साहित्यिक वारशाचे जतन करणे, वाचनसंस्कृती रुजविणे आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देणे, हा ‘पुस्तकांचे गाव’ संकल्पनेमागील प्रमुख उद्देश आहे. या गावामध्ये मराठी, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलगू, राजस्थानी आदींसह देशभरातील सर्वच भाषांतील पुस्तके ठेवून ‘भाषा अनेक राष्ट्र एक’ ही संकल्पना राबविली जाणार आहे. यामुळे बाबूपट्टीला साहित्य, शिक्षण आणि संस्कृतीचे केंद्र म्हणून राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्र जन्मभूमी, बाबूपट्टी कर्मभूमी – निवृत्ती यादव

‘महाराष्ट्र माझी जन्मभूमी, तर बाबूपट्टी माझी कर्मभूमी आहे. भाषा आणि प्रांताच्या सीमा समाजसेवेच्या आड येऊ शकत नाहीत. ‘भाषा अनेक, राष्ट्र एक’ या भावनेतून दोन्ही राज्यांमध्ये साहित्य आणि संस्कृतीचा सेतू निर्माण करायचा आहे,’ असे निवृत्ती यादव यांनी सांगितले. अहमदपूर ते बाबूपट्टी असा प्रवास करत यादव यांनी हाती घेतलेला हा उपक्रम केवळ एका गावाच्या विकासापुरता मर्यादित नसून, साहित्यिक वारसा जपण्यासोबतच राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सहभागाचा संदेश देणारा ठरत आहे.

Read About : Global M&A – जागतिक विलीनीकरण – खरेदी व्यवहारांना मोठा फटका; तिसऱ्या तिमाहीत व्यवहारमूल्य 36.9 टक्क्यांनी घटले
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.