Ad Advertisement Ad Advertisement

Domestic Harassment Case Quashed – कौटुंबिक छळाचा गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द; पतीसह सात जणांना दिलासा

आरोप सर्वसाधारण स्वरूपाचे असल्याचे न्यायालयाचे निरीक्षण; ॲड. कानडे अंगद एल. (भाटसांगवीकर) यांच्या युक्तिवादाला यश

छत्रपती संभाजीनगर : Domestic Harassment Case Quashed कौटुंबिक वादातून पती, सासू-सासरे आणि नणंदेसह सात जणांविरुद्ध दाखल करण्यात आलेला कौटुंबिक छळाचा फौजदारी गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने रद्द केला. संबंधित आरोपींविरुद्धचे आरोप सर्वसाधारण स्वरूपाचे असून, प्रत्येकाची स्वतंत्र गुन्हेगारी कृती स्पष्ट होत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. कानडे अंगद एल. (भाटसांगवीकर) यांनी युक्तिवाद केला.

बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलिस ठाण्यात १७ मार्च २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ८५, ३५२, ३५१ (२) सह कलम ३ (५) अन्वये एफआयआर क्रमांक ०१०७/२०२६ दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पती, सासू-सासरे आणि नणंदेसह सात जणांना आरोपी करण्यात आले होते.

सदर गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपींच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात फौजदारी अर्ज क्रमांक २५५५/२०२६ दाखल करण्यात आला. या अर्जावर सुनावणीदरम्यान ॲड. कानडे अंगद एल. (भाटसांगवीकर) यांनी आरोपींच्या वतीने बाजू मांडली.

आरोपांमध्ये स्वतंत्र कृतीचा उल्लेख नाही
  • प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने नमूद केले की, अर्जदारांविरुद्ध करण्यात आलेले आरोप सर्वसाधारण स्वरूपाचे आहेत. कोणत्याही अर्जदाराने नेमकी कोणती कृती केली किंवा त्याच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हेगारी कृत्य काय आहे, याचा स्पष्ट उल्लेख तक्रारीत आढळत नाही. तसेच पतीशी असलेल्या नातेसंबंधामुळेच अन्य अर्जदारांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.
  • अशा परिस्थितीत फौजदारी कार्यवाही सुरू ठेवणे म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर ठरेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. त्यामुळे न्यायहिताच्या दृष्टीने संबंधित गुन्हा रद्द करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
  • त्यानुसार न्यायमूर्ती सुशील एम. घोडेस्वर यांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशात नेकनूर पोलिस ठाण्यात दाखल एफआयआर क्रमांक ०१०७/२०२६ सातही अर्जदारांच्या संदर्भात रद्द करून बाजूला सारला. या निर्णयामुळे पतीसह सातही आरोपींना दिलासा मिळाला. आरोपींच्या वतीने ॲड. कानडे अंगद एल. (भाटसांगवीकर) यांनी काम पाहिले.

Read About : Global M&A – जागतिक विलीनीकरण – खरेदी व्यवहारांना मोठा फटका; तिसऱ्या तिमाहीत व्यवहारमूल्य 36.9 टक्क्यांनी घटले
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.