सिंचनाची स्थितीही भीषण, बळीराजा झुरणी!!
छत्रपती संभाजीनगर
Rabi Crop Sowing in Marathwada
विभागातील छत्रपती संभाजीनगरसह जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत रब्बी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख २७ हजार ५७५ हेक्टर असून, यंदा प्रत्यक्षात १३ नोव्हेंबरपर्यंत केवळ १ लाख ३ हजार ९८८ हेक्टर क्षेत्रावर (१४.२९ टक्के) पेरणी झाली आहे.
कधी नव्हे ती यावेळी पावसाने पाठ फिरवल्याने यंदा खरीप हंगामासह ‘रब्बी’ ला मोठा फटका बसला आहे. जमिनीत पुरेशी ओल नसून, पाण्यासह सिंचनाची स्थिती भीषण बनली आहे. खरीपातून काहीच हाती न लागल्यामुळे आणि पावसाअभावी शेतकऱ्यांनी रब्बी पेरण्यांसाठी हात आखडता घेतला आहे.
गतवर्षीही ‘रब्बी’ला खीळ
गतवर्षी नोव्हेंबरच्या प्रारंभीच अवकाळी पावसामुळे रब्बी पेरणीला खीळ बसली होती. ४ नोव्हेंबरपर्यंत विभागातील ३ जिल्ह्यांत सुमारे ८० हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. शेतांत पावसाचे पाणी साचल्याने मशागत आणि पेरणीची कामे रखडली होती. यंदा मात्र पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पेरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळामुळे यंदा १३ नोव्हेंबरपर्यंत पेरणीची गती अत्यंत संथ असल्याचे ताज्या पेरणी अहवालावरून स्पष्ट होते. यंदा रब्बी हंगामातून अपेक्षित उत्पादन मिळणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
पेरणीची स्थिती चिंताजनक
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रब्बी पिकांंचे २ लाख ३८ हजार ८२२ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, केवळ १३ हजार ७४२ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ५.७५ टक्के एवढी पेरणी झाली आहे. जालना जिल्ह्यात रब्बी पिकांचे २ लाख ११ हजार ८२० हेक्टर क्षेत्र असून, पैकी १० हजार १३८ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ४.७९ टक्के एवढी पेरणी झाली आहे. त्या तुलनेत बीड जिल्ह्यात २ लाख ७६ हजार ९३४ हेक्टर क्षेत्रापैकी ८० हजार १०७ हेक्टरवर (२८.९३ टक्के) पेरणी झाली आहे.
वाढला ज्वारीचा पेरा; मागे राहिला गहू, हरभरा!
पीकनिहाय विचार करता विभागात रब्बी ज्वारी पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ७४ हजार ४६५ हेक्टर असून, यंदा केवळ ५९ हजार ४३२ हेक्टर उवढ्या क्षेत्रावर (२१.६५ टक्के) पेरणी झाली आहे. हरभरा पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ४४ हजार ६३९ हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत फक्त ४ हजार ३२२ हेक्टर क्षेत्रावर (२.९९ टक्के) पेरणी झाली आहे. गहू पिकाची पेरणी ७.९१ टक्के, मका – ५.२३ टक्के, तर करडई पिकाची केवळ १.९६ टक्के एवढी पेरणी झाली आहे. कडधान्यांची पेरणीही अवघी ५.२९
टक्क्यांवरच आहे.


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.