Ad Advertisement Ad Advertisement

Son Kills Father in Chhatrapati Sambhajinagar – स्वयंपाक आवडला नाही म्हणून अर्धांगवायूग्रस्त वडिलांचा गळा घोटला

हमालवाड्यातील ह्रदयद्रावक घटना : आजारी असूनही वडीलच करायचे दोन वेळचा स्वयंपाक

छत्रपती संभाजीनगर : Son Kills Father in Sambhajinagar पत्नीच्या निधनानंतर मोलमजुरी करून तिन्ही मुलांना लहानाचे मोठे करणाऱ्या आणि स्वत:ला अर्धांगवायूचा झटका आलेला असतानाही दोन वेळचा स्वयंपाक करून मुलांना खाऊ घालणाऱ्या जन्मदात्याचा पोटच्या मुलानेच निर्घृण खून केला. वडिलांनी केलेला स्वयंपाक आवडला नाही, या कारणावरून संतापलेल्या धाकट्या मुलाने वडिलांचे डोके भिंतीवर आदळून आणि गळा व नाक-तोंड दाबून त्यांचा जीव घेतला. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना रेल्वे स्टेशनजवळील हमालवाडा (गल्ली क्र. ५) येथे शनिवारी रात्री घडली.

साहेबराव म्हस्के असे मयत वडिलांचे नाव असून, आरोपी मुलगा कैलास साहेबराव म्हस्के याला सातारा पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली. आरोपीचा भाऊ विलास म्हस्के (३८, रा. गल्ली नं ५, हमालवाडा, रेल्वे स्टेशन) हा फिर्यादी आहे. त्यानुसार, मुले लहान असतानाच साहेबराव म्हस्के यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर साहेबराव यांनीच आईची माया देत आणि मोलमजुरी करून तिन्ही मुलांचा सांभाळ केला.

मोठा मुलगा उमेश हा वडिलांनी बांधलेल्या दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर कुटुंबासह वेगळा राहतो, तर तळमजल्यावर साहेबराव हे विलास आणि कैलास यांच्यासह राहत होते. साहेबराव यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांची एक बाजू कमकुवत झाली होती. शरीराने साथ सोडलेली असतानाही ते स्वत: दोन वेळचा स्वयंपाक करून दोन्ही मुलांना खाऊ घालत होते. मात्र, वडिलांनी केलेल्या स्वयंपाकावरून कैलास नेहमीच कुरबूर करत वाद घालायचा, असे चौकशीत समोर आले.

चहासाठी बिस्किटे आणली, पण सकाळ पाहूच दिली नाही!

शनिवारी (दि. १४) रात्री साडेआठच्या सुमारास विलास घरी आला असता, वडिलांनी बनवलेले जेवण जेऊन तिघांनी एकत्र टीव्हीवर चित्रपट पाहिला. रात्री नऊ वाजता चित्रपट संपल्यावर विलासने वडिलांना सकाळी चहासोबत खाण्यासाठी दुकानातून बिस्किट आणून दिले. ९.०५ वाजता तो तंबाखू खाण्यासाठी घराबाहेर पडला. त्यानंतर लगेचच स्वयंपाकाच्या कारणावरून कैलासने वडिलांशी भांडण सुरू केले. हा वाद वाढताच संतापाच्या भरात त्याने अर्धांगवायूने आधीच कमकुवत असलेल्या वडिलांना बेदम मारहाण केली, त्यांचे डोके भिंतीवर आदळले आणि गळा व नाक-तोंड दाबून त्यांचा जीव घेतला.

वडिलांनी बोचकरल्याचे सांगत पळाला पण पोलिसांनी पकडला

वडिलांचा खून केल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत कैलासने किराणा दुकानाजवळ उभ्या असलेल्या विलासकडे धाव घेतली. पप्पांनी मला शिव्या दिल्या, मारहाण केली, हे बघ मला बोचकारले असा बनाव रचत त्याने स्वत:चा गळा दाखवला आणि तिथून पळ काढला. मात्र, जेव्हा हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडून ताब्यात घेत अटक केली.

शवविच्छेदन अहवालातून बिंग फुटले

विलास धावप-पळत घरी गेला. तेव्हा वडील निपचित पडलेले दिसले. त्याने आवाज दिला पण काहीच प्रतिसाद न मिळाल्याने भाऊ उमेश आणि मावस भाऊ संदीप साळवे यांच्या मदतीने वडिलांना तातडीने घाटीत नेले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. रविवारी (दि. १५) झालेल्या शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर दुखापत आणि मान व नाक-तोंड दाबून श्वास रोखल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच खुनाचा उलगडा झाला. याप्रकरणी विलास म्हस्केच्या फिर्यादीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी कैलासला बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक मारोती खिल्लारे करत आहेत.

काळीज पिळवटणारी शोकांतिका

पत्नीच्या निधनानंतर मोलमजुरी करून तिन्ही मुलांना वाढवले; अपंगत्वावर मात करत वडीलच खाऊ घालायचे दोन वेळचे जेवण.

क्रौर्याचा कळस

खुनानंतर पप्पांनीच मला बोचकारले, असा रचला बनाव; सातारा पोलिसांनी नराधम मुलाला ठोकल्या बेड्या.

Read About : Chhatrapati Sambhajinagar Burglary – 6 वाजता कुटुंबीय हैदराबादला गेले अन् 9 वाजता चोराने फ्लॅट फोडला!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.