लिफ्टने आला, दीड तास घर धुंडाळले अन् लिफ्टनेच गेला : सादात नगरातून ४ तोळे सोने, २ लाख रोकड लंपास
छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar Burglary हैदराबादला जाण्यासाठी प्लॉटिंग व्यावसायिकाचे कुटुंब सकाळी ६ वाजता घराबाहेर पडले. त्याच रात्री ९ वाजता त्यांचा चौथ्या मजल्यावरील फ्लॅट फोडून चोराने ४ तोळे सोने आणि २ लाख रोकड लंपास केली. ही घटना १० नोव्हेंबरला सादात नगरातील सादात अपार्टमेंटमध्ये घडली. १३ नोव्हेंबरला मध्यरात्री कुटुंबीय परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, चोरटा लिफ्टनेच वर गेला आणि तब्बल दीड तास घर धुंडाळून पुन्हा लिफ्टनेच खाली उतरून पसार झाला. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
उजेफ खान अजिज खान पठाण (४०, रा. फ्लॅट क्र. ४०४, सादात अपार्टमेंट, सादात नगर रोड) हे प्लॉटिंग व्यावसायिक आहेत. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता ते कुटुंबासह हैदराबाद येथे गेले. १३ नोव्हेंबरला रात्री ११ वाजता ते घरी परतले. तेव्हा त्यांना फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले व घरातील सर्व साहित्य अस्तव्यस्त पडलेले दिसले. चोरट्याने कपाटातील २ लाख रोकड, १० ग्रॅमचा नेकलेस, २१ ग्रॅमचा दुसरा नेकलेस आणि ८ ग्रॅमचे सोन्याचे कानातले दोन जोड, असा लाखोंचा ऐवज चोरून नेला.
चोरटा सीसीटीव्हीत कैद
चोरांनी घर फोडल्याचे लक्षात येताच पठाण यांनी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. ज्या दिवशी सकाळी ६ वाजता ते हैदराबादला गेले, त्याच रात्री ९ वाजता एक अनोळखी व्यक्ती लिफ्टने वर जाताना आणि रात्री १०.३० वाजता लिफ्टनेच खाली उतरताना दिसला. त्यानेच घर फोडल्याचा संशय पठाण यांनी व्यक्त केला. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे करत आहेत.
रेकी करून घर फोडले?
पठाण कुटुंबीय सकाळी ६ वाजता घराबाहेर पडले. जाताना त्यांनी फ्लॅटला नीट कुलूप लावले होते. त्याच रात्री ९ वाजता चोरटा लिफ्टने थेट चौथ्या मजल्यावरील त्यांचा फ्लॅट फोडतो. तब्बल दीड तास तो त्यांच्या घरात ऐवज धुंडाळतो. यावरून चोरट्याला पठण कुटुंब बाहेरगावी गेल्याची पक्की टीप मिळालेली होती का? असा प्रश्न पडतो. चोराने रेकी करूनच हे घर फोडले असावे, असा संशय आहे.
Read About : Investment Scam Sambhajinagar – 20 दिवसांत दामदुप्पटचे आमिष दाखवून गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.