एनपीसीआयची ‘यूपीआय व्यापार सक्षम’ योजना : क्यूआर कोडसाठी ३००, तर साऊंडबॉक्ससाठी ७५० रुपयांचे प्रोत्साहन
नवी दिल्ली : NPCI UPI Merchant Incentive Scheme छोट्या व्यापाऱ्यांमध्ये डिजिटल पेमेंटचा वापर वाढविण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने ‘यूपीआय व्यापार सक्षम योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष क्यूआर कोड बसविण्यासाठी ३०० रुपये, तर साउंडबॉक्ससाठी ७५० रुपयांचे प्रोत्साहन दिले जाणार आहे. मात्र, त्यासाठी ठरवून दिलेल्या पात्रता अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
एनपीसीआयने ११ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकात या योजनेची माहिती दिली आहे. नव्या छोट्या व्यापाऱ्यांना यूपीआय प्रणालीशी जोडणे, डिजिटल पेमेंटची सुविधा वाढविणे आणि यूपीआय व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ घडवून आणणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. विशेषत: लहान शहरे आणि डिजिटल पेमेंटच्या सुविधा मर्यादित असलेल्या भागांवर योजनेत भर देण्यात आला आहे.
या योजनेचा लाभ प्रामुख्याने टियर-३ ते टियर-६ श्रेणीतील शहरे, ईशान्येकडील राज्ये, जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांतील व्यापाऱ्यांना मिळणार आहे. याशिवाय, केंद्र सरकारच्या अधिसूचित योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या पात्र व्यापाऱ्यांनाही याचा लाभ घेता येईल.
क्यूआर कोड आणि साउंडबॉक्ससारख्या डिजिटल पेमेंट सुविधांचा विस्तार करण्याबरोबरच त्यांचा प्रत्यक्ष वापर वाढविण्यावर या योजनेत भर देण्यात आला आहे. त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना डिजिटल व्यवहारांच्या प्रवाहात आणण्यास आणि देशातील डिजिटल पेमेंट व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
वाढीव रकमेच्या ०.२० टक्के मिळणार
तिसऱ्या घटकांतर्गत निर्धारित क्षेत्रांतील यूपीआय व्यवहारांच्या मूल्यामध्ये झालेल्या अतिरिक्त वाढीला प्रोत्साहन दिले जाईल. मागील तिमाहीच्या तुलनेत पात्र व्यवहारांच्या मूल्यात झालेल्या वाढीव रकमेच्या ०.२० टक्के प्रोत्साहन दिले जाणार आहे. हा लाभ दुसऱ्या घटकांतर्गत मिळणाऱ्या प्रोत्साहनाव्यतिरिक्त असेल.
निधीचे तीन घटकांमध्ये विभाजन
या योजनेसाठीच्या निधीचे तीन घटकांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. नव्या व्यापाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी ३० टक्के, यूपीआय व्यवहारांमध्ये वाढ करण्यासाठी ५० टक्के, तर व्यवहारांमधील अतिरिक्त वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी २० टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. पहिल्या घटकांतर्गत नव्याने यूपीआयशी जोडल्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रत्येक प्रत्यक्ष क्यूआर कोडसाठी ३०० रुपये आणि साउंडबॉक्ससाठी ७५० रुपये दिले जातील. यासाठी संबंधित व्यापाऱ्याने तीन महिन्यांपैकी किमान दोन महिन्यांत प्रत्येकी २५ पात्र यूपीआय व्यवहार करणे आवश्यक आहे. तसेच, प्रत्येक महिन्यातील व्यवहारांचे एकूण मूल्य किमान पाच हजार रुपये असावे. संबंधित व्यापारी योजनेच्या निर्धारित भौगोलिक क्षेत्रातील किंवा केंद्र सरकारच्या अधिसूचित योजनेंतर्गत पात्र असणेही आवश्यक आहे.
व्यवहार वाढल्यास अतिरिक्त लाभ
दुसऱ्या घटकांतर्गत यूपीआय व्यवहारांच्या संख्येत वाढ करणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. यासाठी मागील तिमाहीच्या तुलनेत पात्र यूपीआय व्यवहारांच्या संख्येत किमान पाच टक्के वाढ होणे आवश्यक आहे. पात्र व्यवहारांच्या एकूण मूल्याच्या ०.०३ टक्के रक्कम प्रोत्साहन म्हणून दिली जाणार आहे. निर्धारित भौगोलिक क्षेत्रातील व्यापाऱ्यांना याशिवाय ५० टक्के अतिरिक्त प्रोत्साहन मिळणार आहे.
Read About : Money Transfer Without Bank Account – बँक खाते नसतानाही पाठवता येणार 50 हजार रुपये!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.