Ad Advertisement Ad Advertisement

CM Devendra Fadnavis – अजितदादांची शिस्त, निर्णयक्षमता आणि कामाचा ठसा प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा

पुणे – CM Devendra Fadnavis दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे कणखर, शिस्तप्रिय, प्रशासनावर पकड असलेले आणि दूरदृष्टीचे नेतृत्व होते. पुणे जिल्हा परिषदेच्या कामकाजाला दिशा देण्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे नवे नेतृत्व उभे राहिले. ज्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी पुण्याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्न केले त्या पुणे जिल्हा परिषदेने त्यांच्या स्मरणार्थ पुतळा उभारणे आणि प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देणे हा त्यांच्या कार्याचा उचित गौरव आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.

पुणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उभारण्यात आलेल्या लोकनेते अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराला ­‘अजितदादा पवार प्रवेशद्वार’ असे नामकरण करण्यात आले.

अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले, एखादी गोष्ट पटली तर ते ठामपणे तिच्या पाठीशी उभे राहत आणि न पटलेली गोष्ट स्पष्टपणे नाकारत. वित्तमंत्री म्हणून अनेक अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी कठीण परिस्थितीतही आर्थिक शिस्त कायम राखली. विकासकामांमध्ये निधीचा योग्य विनियोग, कामांची गुणवत्ता आणि अपेक्षित परिणाम यावर त्यांचा विशेष आग्रह असायचा.

सकाळी सहा वाजता कामासाठी तयार होऊन सात वाजल्यापासून कामकाजाला सुरुवात करण्याची त्यांची शिस्त सर्वांनी अनुभवली आहे. महाराष्ट्रातील अनेक विकास प्रकल्पांवर त्यांच्या कामाचा ठसा आहे. वरकरणी कणखर वाटणारे अजितदादा जवळच्या माणसांवर तितकेच उत्कट प्रेम करायचे. सहकारी म्हणून त्यांनी दिलेली साथ आणि मार्गदर्शन कायम स्मरणात राहील. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही त्यांची पदोपदी आठवण येते, असे फडणवीस म्हणाले.

चौकशी अहवालासाठी पाठपुरावा

अजितदादांच्या अपघाती निधनाच्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर यावा यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे विनंती केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्याचा विकासाचे शिल्पकार – एकनाथ शिंदे

पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासात अजितदादांचे मोठे योगदान आहे. पुणे मेट्रो, रिंग रोड आणि वाहतूक कोंडी सोडविण्यासारख्या महत्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांची भूमिका मोलाची होती. त्यामुळे त्यांना पुणे जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आमदार, विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. सहकार क्षेत्राचाही त्यांना दांडगा अनुभव होता. साखर कारखाने अडचणीत असताना त्यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारने साखर कारखान्यांवरील प्राप्तिकर माफ करण्याचा निर्णय घेतला, असे सांगून एकनाथ शिंदे म्हणाले, शासकीय वास्तूच्या माध्यमातून नागरिकांना न्याय आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशी त्यांची भूमिका होती. वास्तूंचे बांधकाम करताना प्रत्येक बाबीवर ते बारकाईने लक्ष देत असत.

परखडपणा, स्पष्टवक्तेपणा, निर्भीडपणा आणि प्रेमळपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते. सामान्य नागरिकांचे कल्याण हा त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा केंद्रबिंदू असायचा. विविध योजनांची आणि प्रकल्पांची सखोल माहिती घेऊन ते निर्णय घेत असत, असेही त्यांनी सांगितले.

आजचा क्षण अत्यंत भावनिक – सुनेत्रा पवार

लोकनेते अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण होत असलेला आजचा क्षण अत्यंत भावनिक आहे. ज्या पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी आयुष्य वेचले, त्याच जिल्हा परिषदेच्या प्रांगणात त्यांचा पुतळा उभारला जात आहे, ही अभिमानाची बाब आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या.

महाराष्ट्रातील छोट्या गावांपर्यंत त्यांच्याविषयी असलेले प्रेम हेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे खरे प्रमाणपत्र आहे. अजितदादांच्या निधनानंतर गावोगावी भेटी दिल्या असता नागरिकांच्या मनातील त्यांच्याविषयीचे प्रेम अनुभवायला मिळाले. त्यांचा पुतळा आणि प्रवेशद्वाराला दिलेले नाव हे केवळ स्मारक नसून लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून देणारी प्रेरणा आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. अजितदादांचा विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.

Read About – Most Followed Instagram Celebrities in Asia 2026 – आशियात विराटचा बोलबाला, बॉलिवूडमध्ये प्रियांकाचा जलवा
E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.