पांढऱ्या रंगाचा कोट्यवधींचा अश्व : ४० बाउन्सरच्या गराड्यात शाही एन्ट्री
जयपूर : Pushkar Fair Badal Horse – राजस्थानमधील प्रसिद्ध अजमेर पुष्कर मेळ्यात यंदा राहुल जेतवाल यांच्या ‘बादल’ नावाच्या पांढऱ्या घोड्याने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रविवारी जेव्हा त्याने शाही थाटात एन्ट्री घेतली, तेव्हा तिथला नजारा बघून सगळेच अवाक झाले.
बादलची एन्ट्री कोणत्याही बड्या फिल्मी स्टारपेक्षा कमी नव्हती. ढोल-ताशांच्या गजरात आणि तब्बल ४० बाउन्सरच्या कडक सुरक्षा वलयाखाली तो मेला मैदानावर पोहोचला. त्याच्या स्वागतासाठी मालकाने चक्क नोटांची उधळण केली.
या हाय-प्रोफाइल एन्ट्रीमुळे आजूबाजूला तुफान गर्दी जमून रस्त्यावर वाहतूकीची कोंडी झाली होती. प्रत्येक जण या ऐतिहासिक क्षणाला मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उत्सुक होता. केकडी येथील रहिवासी असलेल्या राहुल जेतवाल यांचा हा पांढऱ्या रंगाचा घोडा ५.५ फुटांपेक्षा जास्त उंच आहे. यावर्षी ते बादलशिवाय न्यू बादल आणि विश्वास हे दोन घोडे घेऊन मेळ्यात आले आहेत. न्यू बादलची उंची सुमारे ६७ इंच तर विश्वासची उंची सुमारे ६५ इंच आहे. या तिन्ही अप्रतिम घोड्यांची किंमत कोटींत सांगितली जात आहे.
गेल्या वर्षीची चर्चा
विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही बादलची मोठी चर्चा रंगली होती. त्यावेळी तो तब्बल २८५ पिल्लांचा पिता असल्याचा दावा करण्यात आला होता आणि त्याला तब्बल ११ कोटी रुपयांपयंर्तची खरेदी ऑफर मिळाली होती. मात्र, मालक राहुल जेतवाल यांनी तो विकण्यास स्पष्ट नकार दिला होता.
हॉर्स सोसायटीची भूमिका
दुसरीकडे, अशा अवाढव्य किंमतीच्या दाव्यांवर ऑल इंडिया मारवाडी हॉर्स सोसायटीचे अध्यक्ष गजेंद्र सिंह पोसाना यांनी स्पष्ट केले होते की, घोडेमालक आपल्या घोड्यांच्या प्रदर्शनासाठी कितीही किंमत सांगू शकतात. परंतु, घोड्याची खरी किंमत तो प्रत्यक्ष विकला जाईल तेव्हाच ठरते. अनेकदा प्रजनन करण्यासाठी असे घोडे सांभाळले जातात, त्यामुळे मालक त्यांची अव्वाच्या सव्वा किंमत सांगतात, पण प्रत्यक्षात ते ते विकत नाहीत. ही केवळ स्वत:कडे असलेल्या संपत्तीचे मूल्य ठरवण्यासारखी एक पद्धत आहे.
Read About : NVIDIA AI National Champion : एनव्हीडियासह 24 हून अधिक अमेरिकी कंपन्यांना मिळणार विशेष दर्जा?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.