कालव्यात सापडलेल्या मृतदेहाचे पाच महिन्यांनी गुढ उकलले
परभणी Parbhani murder case : दैठणा पोलीस ठाणे हद्दीत सिंगणापूर गावाजवळ जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या अज्ञात युवकाच्या मृतदेहाचे गूढ अखेर स्थानिक गुन्हे शाखेने उकलले आहे. मयत गीताराम प्रकाश मुजमुले असल्याचे डीएनए तपासणीवरून निष्पन्न झाले असून, त्याचा खून करून प्रेत कालव्यात फेकल्याप्रकरणी त्याचे वडील प्रकाश सखाराम मुजमुले व भाऊ कृष्णा प्रकाश मुजमुले यांना अटक करण्यात आली आहे.
१० मे २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास सिंगणापूर गावानजीक असलेल्या जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यामध्ये अज्ञात तरूणाचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. मृतदेह कुजलेला असल्याने पोस्टमार्टम नंतरही मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. प्रकरण अत्यंत क्लिष्ट असल्याने अडीच महिन्यानंतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. तपासासाठी पथके रवाना करण्यात आली.
पथकांनी जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा व अमरावती जिल्ह्यांतील तसेच लागून असलेल्या जिल्ह्यांतील सर्व पोलीस पाटलांकडून माहिती घेतली. कालव्या नजीक असलेले शेतकरी, हॉटेल, साखर कारखाने यांच्याकडूनही माहिती घेतली. मृताच्या अंगावरील शर्टच्या कॉलर मार्कवरून संबंधित कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे तेथे जाऊन माहिती घेण्यात आली. परंतु माहिती मिळाला नाही.
रेड ॲपद्वारे छायाचित्र
स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्व अधिकारी-अंमलदार यांनी सतत १० दिवस मृताची शोधपत्रिका व्हॉट्सअप स्टेटसला ठेवली, जेणेकरून कोणी खाजगी माहितीगार पोलिसांना माहिती देईल. मृताचे जिल्हा पोलीस दल रत्नागिरी यांच्या रेड ॲपद्वारे छायाचित्र तयार करण्यात आले. दरम्यान ग्राम देवनांद्रा, ता. पाथरी येथील शेत आखाड्यावर सालगडी म्हणून काम करत असलेल्या कुटुंबातील एक तरूण बेपत्ता असून त्याबाबत त्याच्या पालकांनी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद केलेली नाही अशी माहिती पोलिसांना मिळाली. मृताच्या अंगावरील कपडे त्याच्या मित्राने त्यास दिले असल्याने तो मृत गीताराम असल्याचे समोर आले.
सततच्या त्रासाला कंटाळून केले ठार
मयताची शास्त्रोक्त ओळख पटविणे आवश्यक असल्याने मृताचे संशयित पालकांचे रक्त नमुने प्रादेशिक प्रयोगशाळा, नांदेड येथे पाठविण्यात आले. प्राप्त अहवालावरून मृत हा गीताराम प्रकाश मुजमुले असल्याचे निष्पन्न झाले. तसेच मयताकडून सतत दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे त्याचे वडील प्रकाश मुजमुले व भाऊ कृष्णा मुजमुले यांनी गीताराम यास मारून त्याला दोरीने बांधून गावालगत असलेल्या जायकवाडी कालव्याच्या वाहत्या पाण्यात टाकून दिल्याचे स्पष्ट झाले. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, अशोक जायभाये, चंदन परिहार, गणेश सवंडकर, विलास सातपुते, पांडुरंग तुपसुंदर, मुकेश बुधवंत, सुनिल राठोड, कौटकर यांच्या पथकाने केली.
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.