७ लाख शेतकऱ्यांची होरपळ, रोजगारांच्या शोधार्थ पळापळ
छत्रपती संभाजीनगर : Diwali Darkness in Rural Villages पावसाअभावी खरीप, रब्बी हंगाम उद्ध्वस्त झाल्याने जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. शेतशिवारात कुठेही पीक नाही, हातात पैसाअडका नाही आणि पुढील हंगामासाठी भांडवलही नाही, अशा दुष्ट चक्रात बळीराजा भरडून निघाला आहे. शेतीत गुंतवलेले भांडवलही हाती आले नाही. गावांत रोजगार उपलब्ध नसल्यामुळे शेतमजूर कुटुंब- कबिल्यासह गावांतून स्थलांतरित होत आहेत. आर्थिक व्यवहार मंदावले असून, त्याचा परिणाम यंदाच्या दिवाळीवर झाल्याचे दिसून आला.
घराघरांत पणत्या पेटल्या; मात्र खरेदीचा उत्साह नव्हता. घराघरांवर कुठे आकाशदिवेही चमकले नाही. एकूण दिवाळी सणात दुष्काळाच्या झळांनी ग्रामीण भागातील सणाचा आनंदच पार हिरावला गेल्याने जिल्ह्यातील ७ लाख १९,३४४ शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसल्याचे दाहक वास्तव समोर आले आहे.
‘अग्रीम’ पासून शेतकरी वंचित
दुष्काळी अनुदानापोटी मायबाप सरकारने दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांना ५ हजार रुपये अग्रीम दिले. मात्र, ही रक्कम काहींना मिळाली, तर काही अद्यापही प्रतीक्षेत आहेत. केवायसी किंवा फार्मर आयडीची सबब सांगितली जात असली त्यात काही तथ्य नाही. मुळात सरकारच्या तिजोरीत खणखणाट असल्यामुळे सुमारे ५० टक्के शेतकरी अद्यापही ‘दिवाळी अग्रीम’ पासून वंचित राहिल्याची वस्तूस्थिती असल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांनी दिली.
लाखो हेक्टरवरी पिके करपली
प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात कोरडवाहू आणि बागायती मिळून सुमारे ८ लाख ८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे कापूस, मका, सोयाबीन, बाजरी आणि तूर उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. पाण्याअभावी खरीप कांद्याच्या लागवडीही घटल्या असून, लागवड केलेली पिकेही करपली आहेत. भाजीपाला उत्पादकांना कमी बाजारभावामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीत केलेला खर्चही निघाला नाही.
दुष्काळाने आनंद हिरावला
दरवर्षी दिवाळीत दुमदुमणारा ग्रामीण भाग यंदा फटाक्यांच्या आवाजाविना सुना-सुना होता. कपडे, किराणा, मिठाई आणि अन्य खरेदीसाठी गावोगावच्या आठवडी बाजारात सणासुदीत दिसणारी वर्दळ कुठे दिसली नाही. घराघरांत फराळ झाला; मात्र आर्थिक परिस्थितीनुसार त्याचे प्रमाण कमी होते. मुलांचे कपडे आणि कुटुंबीयांच्या खरेदीला कात्री लावण्यात आली. आहे त्याच कपड्यांत सण साजरा करण्यात आला. खरीप पिकांचे नुकसान आणि शेतीमालातून उत्पन्न न मिळाल्याने सणासाठीही पैशांची जुळवाजुळव करावी लागली, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
रोजगारावरही कुऱ्हाड
पिके हातची गेल्याने काढणी, मळणी आणि अन्य शेतीकामांची टंचाई निर्माण झाली. परिणामी, रोजंदारीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या रोजगाराचे दिवस कमी झाले. हाताला काम नसल्याने त्यांच्या कुटुंबांचीही दिवाळी कोरडी गेली. शेतकऱ्यांची खरेदी घटल्याने किराणा दुकानदार, कापड व्यावसायिक आणि छोट्या व्यापाऱ्यांनाही मंदीचा फटका बसला. अशा प्रकारे दुष्काळाने शेतातील उत्पादनाबरोबरच गावागावांतील पैशाचे चक्रही विस्कळित झाल्याचे यंदा दिसून आले. शेतीकामे घटल्याने मजुरांवरही मोठे संकट ओढवले. रोजंदारीच नसल्याने सणाचा खर्च भागविणे कठीण असल्याचे शेतमजुरांनी सांगितले.
गावातील दुकानदार आणि छोट्या व्यावसायिकांची यंदा कधी नव्हे ती मोठी निराशा झाली. उपलब्ध पुंजीतून खर्च भागविण्याची धडपड शेतकऱ्यांना करावी लागली, तर काही कुटुंबांना उधार उसनवार करून लेकरांसाठी सण साजरा करावा लागला.
आनंद, उत्साह हिरावला!
पैशाच्या चणचणीमुळे माय-भगिनींना ओवाळणी आणि आप्तस्वकीयांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंवरही मर्यादा आल्या. दर वर्षीच्या तुलनेत यंदा सणाचा कुठलाही उत्साह नव्हता. सण आला आणि गेला. दिवे पेटले, पण चेहऱ्यांवर आनंद काही दिसला नाही. दिवाळी आली; मात्र दुष्काळाने ग्रामीण जीवनातील सणाचा उत्साहच हिरावून घेतला. दुष्काळाची भीषण छाया पसरल्यामुळे दिवाळी सणाचा कोणताही आनंद आणि उत्साह जाणवला नाही.
-दत्तू शिंदे, शहापूर, ता. गंगापूर.
दिवाळी सण नावापुरताच!
पैठण तालुक्यात विहिरीतील थोड्याफार पाण्यावर लावलेला कांदा जगविण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र ऐन दिवाळीतही सुरू असल्याचे दिसून आले. यंदाचा दुष्काळ सहन न होणारा आहे. वर्षानुवर्षांच्या सणाच्या परंपरा आणि चालीरीती म्हणून दिवाळी कशीबशी साजरी केली. खरिपातील कापूस थोडासा हाती आला, तो मिळेल त्या भावात विकून कसातरी सण साजरा केला; मात्र दिवाळी केवळ नावापुरतीच साजरी झाली, असेच म्हणावे लागेल.
संदीप म्हस्के, आखातवाडा, ता. पैठण.
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.