Ad Advertisement Ad Advertisement

Balasaheb Thackeray Death Anniversary – संकटात असलेल्या बळीराजाला शिवसेनेकडून शक्य ती मदत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा बाळासाहेबांचा मूलमंत्र

मुंबई : Balasaheb Thackeray Death Anniversary – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आणि 80 टक्के समाजकारण तसेच 20 टक्के राजकारण हा मूलमंत्र शिवसेना आजही तितक्याच ताकदीने पुढे नेत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. सध्या राज्यात भीषण दुष्काळ असून या संकटात सापडलेल्या बळीराजाला शिवसेनेकडून शक्य ती सर्व मदत दिली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

‘जिथे संकट, तिथे शिवसेना आणि जिथे आपत्ती, तिथे शिवसेना’ ही बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आम्ही प्रत्यक्ष कृतीतून पुढे नेत आहोत. राज्यातील ज्या ज्या भागांत दुष्काळी परिस्थिती आहे, त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, आमदारांना, खासदारांना आणि मंत्र्यांना दिल्या आहेत, असे सांगून एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांची शिकवण होती की, कार्यकर्ता घरात नाही तर दारात शोभून दिसतो. याच विचारानुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी, दुःख आणि वेदना समजून घेत आहेत.

शिवसेनेकडूनही दिवाळी मदत

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असा शब्द आम्ही दिला होता आणि तो पाळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सरकारच्या वतीने तातडीची पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली असून, शिवसेनेच्या माध्यमातूनही दिवाळी मदत देण्यात आली आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या पाठीशी मदतीचा हात कायम राहील, अशी ग्वाहीसुद्धा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

विरोधकांनी राजकारण करू नये

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 12 प्रकारच्या सवलती आणि नुकसानभरपाईचा लाभ मिळणारच आहे. त्यामुळे विरोधकांनी अग्रीम मदतीच्या मुद्द्यावरून राजकारण करू नये. ही राजकारण करण्याची वेळ नसून शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन त्यांचे दुःख दूर करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

Read about : Jalna Water Crisis 2026 – ‘घाणेवाडी’ ड्राय झाल्यानंतर जालनेकरांना ‘जायकवाडी’चा आधार
E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.