अंबडचे फिल्टर बेड कार्यान्वीत झाल्यानंतर आवक तिपटीने वाढणार
जालना Jalna Water Crisis 2026: उन्हाळ्याला अजून बराच अवकाश आहे. परंतू त्याआधीच ऐन हिवाळ्यातच नवीन जालन्यात पाण्यासाठी नागरीकांची मारामार सुरू झाली आहे. नवीन जालन्याला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा तलावाने जवळपास तळ गाठला असून त्यात सध्या एक ते दीड फुट पाणी आहे. त्यामुळे सध्या तरी या तलावावरच पाणीपुरवठ्याची भिस्त आहे. नवीन जालन्याला जायकवाडी योजनेतून पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. डिसेंबरपर्यंत किंवा नवीन वर्षात जालनेकरांना जायकवाडी धरणातून येणारी पाण्याची आवक सध्याच्या तुलनेत तिपटीने वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे जालनेकरांना मुबलक पाणीपुरवठा करण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
पाण्याच्या बाबतीत जालनेकर कमनशिबी होते. दरवर्षी उन्हाळा आला की, पाणीटंचाईची डोकेदुखी सुरू व्हायची, परंतू जायकवाडी योजना कार्यान्वीत झाल्यानंतर ही डोकेदुखी बंद झाली. त्यानंतर वरूणराजानेही जालना जिल्ह्याला भरभरून दिले. चांगल्या पाण्यामुळे दरवर्षी घाणेवाडी तलाव ओव्हरफ्लो व्हायचा, त्यामुळे आतापर्यंत फारशी टंचाई जाणवली नव्हती. परंतू यावर्षी पुरेशा पाऊस न झाल्याने घाणेवाडी तलाव हिवाळ्यातच ड्राय झाला. सध्या तलावात एक ते दीड फुट पाणी आहे. त्यातून नवीन जालन्याला पाणी दिले जात आहे. शहराला सध्या आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. पाईपलाईन फुटल्यास हा पुरवठा लांबतो. ऐन हिवाळ्यात ही परिस्थिती असेल तर उन्हाळ्यात काय होईल, अशी चिंता सतत असते.
दूषीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या
आतापर्यंतच्या उन्हाळ्यात जालना शहरात फारशी पाणीटंचाई भासली नव्हती, परंतू चार ते पाच वर्षानंतर नवीन जालन्याला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी तलावाने तळ गाठला आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पाण्यातून अजूनही पाणीपुरवठा केला जात आहे. तलावातील गाळामुळे दूषीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या आहे. दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आहेत. पाण्याच्या रंगातही बदल दिसत आहे. त्यामुळे जायकवाडीतून पाणीपुरवठा करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. त्यासाठी महापालिकेने तयारी देखील सुरू केली आहे. घाणेवाडी तलावातील साठ्याची सद्य:स्थिती पाहता महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नियोजन सुरू केले आहे. सध्या घाणेवाडीत उपलब्ध साठ्यातून पाणीपुरवठा सुरू आहे.
डिसेंबरपर्यंत जालनेकरांना मुबलक पाणी
जालना शहर महानगरपालिकेने अंबड येथे ३५ एमएलडी क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र (फिल्टर बेड) उभारले असून त्याची चाचणी घेतली जात आहे. डिसेंबरअखेरपर्यंत किंवा नवीन वर्षात जालनेकरांना शुध्द आणि मुबलक पाणीपुरवठ्यासाठी तयारी सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. सध्या महापालिकेकडून जायकवाडी येथून १७ एमएलडी पाणी घेतले जाते, फिल्टर बेड कार्यान्वीत झाल्यानंतर सुमारे ५५ एमएलडी पाणी घेतले जाणार आहे. त्यामुळे शहरातील सर्वच भागांत मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी नियेाजन केले जात आहे. ही जर वस्तुस्थिती असली तर येणारा उन्हाळा जालनेकरांना सुसह्य जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Read About : Why Glue Does Not Stick to Bottle – डिंक स्वतःच्याच बाटलीला का चिकटत नाही? जाणून घ्या यामागचे रंजक विज्ञान
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.