ऑनलाइन फसवणुकीत शेतकऱ्याला ९९ हजारांचा गंडा
घनसावंगी Cyber Fraud Using New Mothers’ Details : शासकीय योजनांच्या लाभाचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करण्याचे प्रकार वाढत असतानाच घनसावंगी तालुक्यातील पाडूळी खुर्द येथे ऑनलाइन फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसूती झालेल्या महिलांची नावे आणि छायाचित्रे सांगून तसेच आशा सेविका व शासकीय अधिकाऱ्यांची ओळख वापरून भामट्यांनी विष्णू दिगंबर नाईक (वय २८) यांची तब्बल ९९ हजार रुपयांची फसवणूक केली. विशेष म्हणजे, महिलांची इतकी अचूक माहिती भामट्यांपर्यंत पोहोचली कशी, असा गंभीर प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाडूळी खुर्द येथील विष्णू नाईक यांना सायबर भामट्यांनी सर्वप्रथम व्हिडिओ कॉल केला. प्रसूती झालेल्या महिलांच्या खात्यावर शासनाकडून मिळणारे अनुदान जमा होण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. फॉर्म न भरल्यास संबंधित महिलांना शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी भीतीही दाखवण्यात आली. त्यानंतर आशा सेविकेला ऑनलाइन कॉन्फरन्समध्ये सहभागी करून घेतल्याचा आभास निर्माण करण्यात आला. या वेळी गावातील प्रसूती झालेल्या महिलांची नावे आणि छायाचित्रे सांगण्यात आली.
तसेच आशा सेविका आणि बालविकास विभागातील अधिकाऱ्यांची नावे वापरून आपण शासकीय यंत्रणेशी संबंधित असल्याचे भासवण्यात आले. त्यामुळे नाईक यांचा भामट्यांवर विश्वास बसला. याचाच फायदा घेत फोन-पेच्या माध्यमातून त्यांच्या खात्यातून ९९ हजार रुपये काढून घेण्यात आले. नाईक यांनी ट्रॅक्टरच्या बँक कर्जाचा हप्ता भरण्यासाठी शेतीच्या उत्पन्नातून कष्टाने ही रक्कम जमा केली होती. मात्र, सायबर फसवणुकीमुळे हप्त्यासाठी बाजूला ठेवलेले पैसेच गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली. या प्रकारामुळे त्यांच्या कुटुंबासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. याशिवाय गावातील विकास अंकुश नाईक यांचेही सुमारे साडेतीन हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने गेल्याची माहिती समोर आली आहे.
गोपनीय माहिती बाहेर गेली कशी?
या प्रकरणात आर्थिक फसवणुकीपेक्षाही महिलांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे. प्रसूती झालेल्या महिलांची नावे आणि छायाचित्रे भामट्यांना नेमकी कुठून मिळाली, हा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोग्य विभाग किंवा अन्य शासकीय यंत्रणांकडे उपलब्ध असलेली लाभार्थ्यांची माहिती अनधिकृत व्यक्तींच्या हाती लागली आहे का, याची चौकशी होणे आवश्यक आहे. गावातील अन्य महिलांनाही अशाच प्रकारचे फोन आल्याची माहिती समोर येत असल्याने या फसवणुकीचे जाळे अधिक व्यापक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी शासकीय योजनांच्या नावाखाली येणाऱ्या अनोळखी व्हिडिओ कॉल, ऑनलाइन लिंक आणि कॉन्फरन्सपासून सावध राहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Read About : Nvidia CEO Resignation : ‘एनव्हिडिया’तील राजीनामा
E-Paper : Punyanagari E-Paperस्पेशल फीचर


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.