Nvidia CEO Resignation : जगाच्या इतिहासात खळबळ उडवून देणाऱ्या प्रेमप्रकरणांनी भूगोलाला धक्का पोहोचविला आहे. इजिप्तची राणी क्लियोपात्रा आणि रोमन सेनापती मार्क अँटनी, फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट आणि जोसेफिन, ब्रिटनचा राजा एडवर्ड आठवा आणि अमेरिकन महिला वॉलिस सिम्पसन यांचे प्रेमप्रकरण असो की, नव्वदच्या दशकात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि मोनिका लेविन्स्की यांच्यातील प्रेमसंबंधांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात भूकंप आणला. शीतयुद्धाच्या काळात सोव्हियत रशिया आणि पूर्व जर्मनीतील गुप्तचर संस्था आकर्षक एजंटच्या माध्यमातून पाश्चात्त्य अधिकाऱ्यांना फसवत होते. अशीच चीनची कमकुवतपणाचा फायदा घेण्याची शेकडो वर्षे जुनी युद्धनीती आहे? चीनच्या हॅकर्सनी यापूर्वी न्यूयॉर्क टाइम्स आणि खाण कंपन्यांनाही लक्ष्य केले होते. त्यापूर्वीही ‘पार्लर मेड ऑपरेशन’मध्ये चिनी एजंटने ‘एफबीआय हँडलर्स’ला फसविले होते. हाच प्रकार अमेरिकेचे किमती तंत्रज्ञान चोरण्यासाठी होत आहे काय? हे खरे किती आणि खोटे किती, हे शोधाअंतीच स्पष्ट होणार असले, तरी जगात केवळ खळबळच उडाली नाही, तर नफा आणि नुकसानीची मोजमाप होऊ लागली आहे.
एआय आणि चिपनिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘एनव्हिडिया’चे सहसंस्थापक आणि सीईओ जेन्सन हुआंग यांचे तीन प्रेमप्रकरणे आणि त्यानंतर दिलेल्या राजीनाम्याने राजकारणच नव्हे, तर तंत्रज्ञान क्षेत्राला ढवळून काढले आहे. हा विषय एवढ्यापुरताच मर्यादित नाही, तर हेरगिरी वाटणाऱ्या या प्रकरणात अमेरिकेच्या वाणिज्यमंत्र्याची खुर्ची धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे, दररोज सकाळी नवनवीन खुलासे उघडकीस होत असताना ‘एनव्हिडिया’चे तब्बल ४७ लाख कोटी बुडाले आहेत. ही जग जिंकण्याची चीनची शोधयात्रा आहे काय?
१९९३ मध्ये ‘एनव्हिडिया’ची स्थापना करून कंपनीला ३३ वर्षे एकछत्री नेतृत्व देत जगातील सर्वाधिक मूल्यवान कंपनी बनविणाऱ्या हुआंग यांच्या अफेअर साखळीने टेक विश्वाला धक्का दिला आहे. वैयक्तिक संबंधांचे वाद, चिनी गुप्तचर यंत्रणांचे जाळे आणि व्यावसायिक हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घडामोडी केवळ एका कंपनीच्या नाही, तर जागतिक राजकारण, राष्ट्रीय सुरक्षा आणि चिप बाजारपेठेवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या संकटाचा प्रारंभ हुआंग यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादांमधून झाला. त्यांचे कंपनीतील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांसोबत विवाहबाह्य संबंध असल्याच्या चर्चा समोर आल्या. सिंगापूरस्थित ‘मेगास्पीड’ कंपनीची माजी अधिकारी आणि चिनी हेरगिरीचा संशय असलेल्या ॲलिस हुआंग हिच्याशी असलेल्या संबंधांमुळे पुन्हा वाद निर्माण झाला.
याप्रकरणी कंपनीने स्वतंत्र चौकशी जाहीर केली. हे प्रकरण थंडावताच ११ नोव्हेंबरला कंपनीच्याच उपाध्यक्ष किंबरले पॉवेल यांच्याशी संबंध असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर कंपनीतीलच आणखी एका तिसऱ्या महिला कर्मचाऱ्याशीही हुआंग यांची जवळीक असल्याचे समोर आले. या लफड्यांनी अमेरिकेसह चीनमध्ये खळबळ उडालीच; पण संचालक मंडळावर दबाव वाढत गेला. संचालक मंडळाच्या बैठकीनंतर हुआंग यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. हुआंग चुकीचे होते की ते चीनच्या जाळ्यात अलगद फसले? सध्या या प्रकरणाला अत्यंत गंभीर राजकीय आणि आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रिपब्लिकन खासदारांनी तर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत चौकशी तीव्र केली आहे. हुआंग यांनीही अमेरिकन संसदेच्या विविध समित्यांसमोर साक्ष देण्याची तयारी दर्शविली. ‘हाउस सिलेक्ट कमिटी’चे अध्यक्ष जॉन मुलेनॉर यांच्या मते, चिनी हेरांनी अमेरिकेच्या संवेदनशील तंत्रज्ञानापर्यंत आणि गोपनीय माहितीपर्यंत कसा प्रवेश मिळविला व धोरणात्मक निर्णयांवर प्रभाव टाकला का, हे समजून घेण्यासाठी ही साक्ष महत्त्वाची ठरणार आहे.
अमेरिकेत एफबीआय चौकशी करत असताना मलेशिया सरकारनेही ‘मेगास्पीड’ किंवा तिच्या ‘स्पीडमॅट्रिक्स’ या उपकंपनीने मलेशियात आणलेल्या चिप्स बेकायदेशीरपणे चीनला पाठविल्या का, याचा तपास सुरू आहे; परंतु ‘एनव्हिडिया’च्या आतापर्यंतच्या चौकशीत राष्ट्रीय सुरक्षा किंवा कंपनीची गुपिते लीक झाल्याचा पुरावा आढळला नाही. एकीकडे चौकशीचा ससेमिरा सुरू असताना, दुसरीकडे ‘एनव्हिडिया’तील कर्मचाऱ्यांनी ‘बॉसला परत आणा’ अशी मागणी केली आहे. उद्योगपती एलॉन मस्क यांनी तर ॲपलमधून स्टीव्ह जॉब्स यांच्या जाण्याशी हुआंग यांच्या राजीनाम्याची तुलना केली आहे. संस्थापकाची जागा कोणीही घेऊ शकत नाही आणि हुआंग यांना कामावर ठेवणे हा माझा सन्मान असेल, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. विशेषत: जेन्सन यांच्या राजीनाम्यामुळे संगणकीय चिप्सच्या बाजारपेठेत उलथापालथ झाली आहे. आतापर्यंत ‘एनव्हिडिया’ची या क्षेत्रात मक्तेदारी होती. मात्र हेरगिरी वाटणाऱ्या या प्रकरणानंतर गुंतवणूकदारांनी स्पर्धक कंपन्यांकडे मोर्चा वळविल्याचे दिसत आहे. त्यामुळे ब्रॉडकॉम, इंटेल आणि एएमडी यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
आता पुरवठादारांमध्ये विविधता येणार काय किंवा बाजारपेठेतील एकाधिकारशाही संपणार काय? या पेचातून मार्ग काढण्यासाठी ‘एनव्हिडिया’च्या संचालक मंडळाने हार्वे सी. जोन्स यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. मात्र तीन दशकांच्या सुवर्णकाळानंतर जेन्सन हुआंग यांच्या जाण्याने ‘एनव्हिडिया’सह संपूर्ण एआय उद्योगासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता चीनच्या १५० एआय प्रकल्पाचे काय होणार? हा प्रश्न असला तरी कंपनीचा नुकसानीचा आकडा दररोज वाढत आहे. त्यामुळे ही कंपनी आता कशी सावरते, याकडे जगाचे लक्ष लागले आहे; परंतु राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जेन्सन हुआंग यांच्यासोबत बीजिंग शिखर परिषदेला गेले होते. मात्र वर्षभरापूर्वीचा दौरा ट्रम्प यांना आठवत नसल्याने या ‘अफेअर प्रकरणा’चेही गूढ वाढले काय? हा प्रश्नच आहे.
Read About : Bank Liability in Digital Arrest Scams : उपकार नव्हे, जबाबदारी!
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.