Juvenile Gang Crime in India : बंदुकीच्या नळीसमोर उभी असलेली मुलं ही केवळ गुन्हेगारीची भीषण प्रतिमा नाही; ती आपल्या सामाजिक अपयशाचीही कसोटी आहे. त्याच्या हातात शस्त्र येण्याआधी त्याच्या हातात पुस्तक, कामाचे कौशल्य, खेळाचे साधन किंवा विश्वासाने धरता येईल असा एखादा हात पोहोचला होता का, हा प्रश्न आपण स्वत:ला विचारला पाहिजे. कारण प्रत्येक गोळी एखाद्या जीवाचा अंत करते; पण अल्पवयीन हातात दिलेली बंदूक एका मुलाच्या भविष्याचाही खून करू शकते.
कधीकाळी एखाद्या शहराच्या गुन्हेगारी जगताची ओळख त्याच्या कुख्यात टोळ्यांवरून, त्यांच्या म्होरक्यांवरून आणि त्यांनी व्यापलेल्या परिसरांवरून ठरत असे. कोणत्या भागात कोणाची सत्ता चालते, कोणाच्या नावाने व्यापारी धास्तावतात, कोणाच्या वैरातून रक्त सांडते, याची एक अनौपचारिक नोंद शहराच्या सामूहिक स्मृतीत तयार होत असे. आज या गुन्हेगारी जगताचे स्वरूप बदलत आहे. टोळ्यांची नावे तीच असली, त्यांच्या दहशतीची भाषा तीच असली, तरी बंदूक हातात घेऊन समोर येणाऱ्या चेहऱ्यांचे वय अनेकदा कमी झालेले दिसते. गुन्ह्याची सुपारी देणारे आणि गुन्हा प्रत्यक्ष करणारे यांच्यामध्ये आता केवळ अंतर नाही; तर वय, अनुभव, कायद्याची समज आणि परिणामांची जाणीव यांचीही मोठी दरी आहे.
अल्पवयीन मुलांचा गोळीबार, खून किंवा टोळीयुद्धातील हिंसक कारवायांसाठी वापर केला जात असल्याच्या घटना या पार्श्वभूमीवर गंभीरपणे पाहायला हव्यात. मात्र, प्रत्येक अल्पवयीन आरोपीला कुणीतरी मुद्दाम भाड्याने घेतलेला शूटर समजणेही चुकीचे ठरेल. काही प्रकरणांत वैयक्तिक वैर, टोळ्यांमधील संघर्ष किंवा स्थानिक वादातून अल्पवयीन मुलांचा सहभाग दिसतो; तर काही प्रकरणांत संघटित गुन्हेगारी त्यांना पैशाचे आमिष, प्रतिष्ठेचे स्वप्न अथवा दहशतीच्या आभासी जगाचे आकर्षण दाखवून आपल्या जाळ्यात ओढते. या प्रकारांतील फरक लक्षात घेतला तरच या प्रवृत्तीचे खरे स्वरूप समजून घेता येईल.
पुण्यातील अंदेकर प्रकरण या बदलत्या वास्तवाचे अस्वस्थ करणारे उदाहरण आहे. १ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांची नाना पेठ परिसरात गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात अल्पवयीन आरोपींचाही उल्लेख पुढे आला. रक्ताच्या नात्यांतून सुरू झालेला संघर्ष जेव्हा सार्वजनिक रस्त्यावर शस्त्रांच्या भाषेत बोलू लागतो, तेव्हा गुन्हेगारी केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न राहत नाही; ती कुटुंब, सत्ता, प्रतिष्ठा आणि सूड यांच्या विकृत संयोगातून जन्मलेली सामाजिक शोकांतिका बनते. या हत्येचा प्रतिध्वनी पुढेही थांबला नाही.
सप्टेंबर २०२५ मध्ये वनराज अंदेकर यांचा नातू आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात प्रत्यक्ष गोळीबार करणारे, हालचालींवर लक्ष ठेवणारे आणि कथित कटात सहभागी असल्याचा आरोप असलेले असे वेगवेगळे दुवे तपासात समोर आले. सुडाच्या साखळीमुळे एक हत्या दुसऱ्या हत्येचे कारण बनते, दुसरी तिसरीला जन्म देते आणि सूडाच्या या अखंड वर्तुळात पुढची बंदूक कोणाच्या हातात दिली जाईल हे सांगता येत नाही; हे अशा प्रकरणातून प्रकर्षाने समोर आले. २०२३ मध्ये निखिल आखाडेच्या हत्येच्या प्रकरणातही अल्पवयीन मुलांच्या सहभागाचा उल्लेख झाला होता. स्थानिक टोळ्यांच्या संघर्षात तरुण मुलांचा वापर कधी प्रत्यक्ष हल्ल्यासाठी, कधी प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी, तर कधी दहशत निर्माण करण्यासाठी होऊ लागला आणि ही गोष्ट नकळत न्यू नॉर्मल झाली!
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पुणे, नाशिक अशा अनेक परिसरांची नावेही या संदर्भात समोर येतात. २०२४ मध्ये अभिनेता सलमान खान यांच्या हत्येच्या कथित कटाचा तपास करताना नवी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या टोळ्यांशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींच्या हालचालींचा माग काढला. या कटात अठरा वर्षांखालील मुलांचा वापर करण्याचा विचार झाला होता; विविध ठिकाणी शस्त्रसज्ज व्यक्ती तैनात करण्याची योजना असल्याचाही आरोप होता. सलमानच्या निवासस्थानाबाहेरच्या एप्रिल २०२४ मधल्या गोळीबार प्रकरणाने एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला: अल्पवयीन मुलांना वापरण्याची शक्यता ही केवळ एखाद्या गल्लीतील टोळीपुरती मर्यादित नसून, दूरवरून चालवल्या जाणाऱ्या गुन्हेगारी जाळ्यांचाही तो भाग असू शकते. ही धोक्याची घंटा होती, मात्र व्यवस्थेसह आपण सर्वच ढिम्म राहिलो!
देशाच्या राजधानीतून जानेवारी २०२६ मध्ये दिल्ली पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी कथित संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या दोन तरुणांपैकी एक १७ वर्षांचा होता. दिल्लीतल्याच व्यायामशाळेबाहेर आणि एका व्यावसायिकाच्या घराजवळ झालेल्या गोळीबारांच्या तपासात या दोघांची नावे समोर आली होती. समाजमाध्यमांद्वारे संपर्क, परदेशातून दिल्या जाणाऱ्या सूचना, कूटबद्ध संदेशवहन आणि गोळीबारासाठी पैशाचे आमिष यांचे आकर्षण दाखवून या मुलांना बहकवले जाते! गुन्ह्याचा सूत्रधार एका ठिकाणी, प्रत्यक्ष कृती करणारा दुसरीकडे आणि त्यांच्यातील संवाद डिजिटल पडद्याआड असे सारे अपराधसूत्र पक्के होत गेल्याने खरा आरोपी अलीकडील काळात समोर येतच नाही.
या नव्या गुन्हेगारी रचनेत मुलांना नेमके काय आकर्षित करते हा संशोधनाचा विषय आहे. आर्थिक आमिष हा एक भाग आहे; पण तो परिपूर्ण नाही. समाजमाध्यमांवर झळकणारी शस्त्रे, गुन्हेगारांच्या नावाभोवती निर्माण केलेली खोटी प्रतिष्ठा, महागड्या जीवनशैलीची जाहिरात, परिसरात स्वत:ची दहशत असावी अशी इच्छा आणि अपमानाचा बदला घेण्याची उतावीळ मानसिकता या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होऊ शकतो. किशोरवय हा स्वत:ची ओळख शोधण्याचा, समवयस्कांच्या मान्यतेची तीव्र गरज भासण्याचा आणि तात्कालिक आकर्षणांना बळी पडण्याचा काळ असतो. या वयात एखाद्या मुलाला बंदूक म्हणजे सामर्थ्य, गुन्हेगारी टोळी म्हणजे कुटुंब आणि हिंसा म्हणजे प्रतिष्ठा असे भासवले गेले, तर त्याच्या निर्णयक्षमतेवर त्या भ्रामक जगाचा प्रभाव पडू शकतो.
मुलाच्या हातात शस्त्र येते; पण ते शस्त्र कुठून आले, त्याला कोणी उपलब्ध करून दिले, त्याच्या मागे कोण उभे होते, त्याला लक्ष्याची माहिती कोणी दिली, गुन्ह्यानंतर पळून जाण्याची किंवा लपण्याची व्यवस्था कोणी केली, या प्रश्नांची उत्तरे शोधणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्यक्ष गोळी झाडणारा पकडला गेला, म्हणून गुन्हेगारीचा मेंदूही पकडला गेला असे होत नाही. उलट लहान वयाच्या आरोपीला पुढे करून सूत्रधार स्वत:ला तपासाच्या पहिल्या फटक्यापासून दूर ठेवू शकतो, त्यामुळे तपासाने केवळ ट्रिगर दाबणाऱ्या बोटापर्यंत थांबून चालणार नाही; त्या बोटाला दिशा देणाऱ्या संपूर्ण जाळ्यापर्यंत पोहोचले पाहिजे.
एनसीआरबीच्या २०२३ च्या आकडेवारीत महाराष्ट्रात विधीसंघर्षग्रस्त अल्पवयीन मुलांशी संबंधित १,६७५ प्रकरणे नोंदीत झाली. या संख्येच्या वर्गवारीत त्यावर्षी महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर होता. ही संख्या म्हणजे अल्पवयीन मुलांनी केलेल्या गोळीबारांची किंवा भाडोत्री हत्यांची संख्या नव्हे, त्यात विविध प्रकारचे गुन्हे समाविष्ट आहेत. तरीही ती आकडेवारी आपल्याला सावध करते: अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न केवळ काही गाजलेल्या हत्यांपुरता मर्यादित ठेवून चालणार नाही.
बंदुकीच्या नळीसमोर उभी असलेली मुलं ही केवळ गुन्हेगारीची भीषण प्रतिमा नाही; ती आपल्या सामाजिक अपयशाचीही कसोटी आहे. त्याच्या हातात शस्त्र येण्याआधी त्याच्या हातात पुस्तक, कामाचे कौशल्य, खेळाचे साधन किंवा विश्वासाने धरता येईल असा एखादा हात पोहोचला होता का, हा प्रश्न आपण स्वत:ला विचारला पाहिजे. कारण प्रत्येक गोळी एखाद्या जीवाचा अंत करते; पण अल्पवयीन हातात दिलेली बंदूक एका मुलाच्या भविष्याचाही खून करू शकते आणि त्या भविष्याच्या राखेतून पुढचा सूड जन्माला येऊ नये, याची जबाबदारी केवळ पोलिसांची नाही, ती संपूर्ण समाजाची आहे. त्यात आपण कमी पडतो का याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे!
समीर गायकवाड
Read About : Lawrence Bishnoi gang and Indian underworld : अंडरवर्ल्डला वेळीच संपवायला हवं
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.